रत्नागिरी : येथील जिल्हा रूग्णालयाच्या प्रसुतिगृहात प्रसुतीतज्ज्ञ म्हणून डाॅ. सानप हजर झाले असून प्रसूतीगृहात काम करणारे डॉ. विनोद सांगवीकरही लवकरच पुन्हा हजर होणार असल्याने सामान्य रूग्णालयाच्या प्रसुतिगृहाच्या तज्ज्ञांची अडचण दूर झाली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आरोग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करून रूग्णालयाची अडचण त्यांच्या निदर्शनात आणून दिल्याने ही समस्या दूर झाली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या प्रसुतीगृहात काम करणारे डॉ. विनोद सांगवीकर यांची पदोन्नतीनुसार बदली झाल्याने जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीगृहमध्ये तज्ज्ञांअभावी मोठी अडचण निर्माण झाली होती. याची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी संपर्क करत रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाच्या प्रसूतीगृहातील अडचणीबाबत माहिती दिली.जिल्ह्याचे ठिकाण असतानाही बाळंतपणासाठी येणाऱ्या मातांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानुसार पालकमंत्री सामंत यांच्या या मागणीचा आदर करीतआरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ डॉ.विनोद सांगवीकर यांना रुजू करण्याचे आदेश दिले आहेत.सध्या या ठिकाणी प्रसूतीगृहामध्ये डॉ. सानप म्हणून काम करत असुन डॉ. विनोद सांगवीकरही लवकरच हजर होणार आहेत. यासाठी पालकमंत्री यांनी पाठपुरावा करत जिल्ह्यातील बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या मातांना न्याय मिळवून दिल्याबद्दल अनेकांनी आभार मानले.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला मिळाला प्रसुतीतज्ज्ञ; डाॅ. सांगवीकरही होणार रूजू
By शोभना कांबळे | Published: June 26, 2023 2:02 PM