रत्नागिरी : सर्वसामान्यांचे रुग्णालय असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागात तब्बल चार तासांहून अधिकवेळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने आमदार राजन साळवी चांगलेच आक्रमक झाले. मध्यरात्री त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी रुद्रावतार धारण केला. जोवर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) येत नाहीत, तोपर्यंत आपण इथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने अखेर डीनही तेथे दाखल झाले. त्यांनाही आमदार साळवी यांनी धारेवर धरले.राजापूरमधील आपला दौरा आटोपून आमदार साळवी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीत येत होते. त्यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात चार तासाहून अधिक काळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याची तक्रार काही रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे केली. त्यामुळे घरी न जाता आधी ते रुग्णालयात गेले. तेथे प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.अपघातविभागात वैद्यकीय अधिकारी नसल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मेडिकल कॉलेजचे डीन येत नाहीत तोवर जिल्हा रुग्णालयातून हलणार नाही, असे सांगून ते तेथेच ठाण मांडून बसले. त्यानंतर डीन जिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने दाखल झाले.जिल्हा रुग्णालयामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातून रुग्ण येत असतात. अशा वेळेला डॉक्टर उपलब्ध नसतील, तर रुग्णांनी नेमकं करायचं तरी काय? असा प्रश्न आमदार साळवी यांनी केला. ही परिस्थिती गंभीर असून, रुग्णांचे हाल होता कामा नये, असे त्यांनी डीन यांना स्पष्टपणे सांगितले. आपण यामध्ये लक्ष घालणार असून, राज्य शासनाला याबाबत भूमिका घेण्यास भाग पाडू असा पवित्रा सध्या राजन साळवी यांनी घेतला आहे.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात डॉक्टर नाही; आमदार राजन साळवी आक्रमक
By मनोज मुळ्ये | Published: January 17, 2024 11:17 AM