रत्नागिरी : भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात बंद संमिश्र असेल, असे चित्र दिसत होते. मात्र भीमसैनिकांनी जागोजागी काढलेल्या मोर्चांमुळे बंद १०० टक्के यशस्वी झाला.
चिपळूणमध्ये बहादूरशेख नाका येथे दोन गाड्या तसेच एक मोबाईल रिचार्जचे दुकान फोडण्यात आले. महामार्गावर सावर्डे, बहादूरशेख नाका (चिपळूण), पाली (रत्नागिरी) आणि राजापूर येथे रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.भीमा कोरेगावमधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. सकाळच्या सत्रात जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद होता. मात्र ज्यावेळी भीमसैनिक एकत्र जमू लागले आणि मोर्चांना सुरूवात झाली, त्यानंतर व्यापाºयांनी बंदला प्रतिसाद देत दुकाने बंद केली.
महामार्गावर चिपळुणातील बहादूरशेख नाका येथे रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बहादूरशेख नाका येथे एक सुमो आणि एक कार अशा दोन गाड्या फोडण्यात आल्या. सुदैवाने कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
शहरात जुन्या बस स्थानकातील एका बेकरीशेजारी मोबाईल रिचार्जचा काऊंटर आहे. तो सुरू आहे, असे समजून तो फोडण्यात आला. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे महामार्गावर काही जळलेले टायर टाकण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक बंद झाली. पोलिसांनी हे टायर बाजू केल्यानंतर वाहतूक सुरू झाली.रत्नागिरी तालुक्यातील पाली आणि राजापूर तिठा येथेही भीमसैनिकांनी रास्तारोको केले. तेथेही वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. भीमसैनिकांनी राजापुरात मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. दापोली येथे सकाळच्या सत्रापासूनच दुकाने बंद होती. भीमसैनिकांनी बाजारपेठेतून मोर्चा काढला.रत्नागिरी शहरात सकाळच्या सत्रात संमिश्र बंद होता. अकरा वाजण्याच्या सुमारास भीमसैनिक एकत्र जमू लागले. शहरात जयस्तंभ येथे रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर रास्तारोको करणाºया आंदोलनांनी बाजारपेठेतून फेरी काढली. त्यामुळे सुरू असलेली दुकानेही बंद करण्यात आली.