रत्नागिरी : कोकणात उन्हाळी शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, शेतकऱ्यांची स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना सुरू केली आहे. जिल्ह्यासाठी ४०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असताना ३१७ शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते. १९९ शेततळ्यांना प्रत्यक्ष मंजुरी मिळाली, पैकी ६७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १५५ शेततळ्यांची आखणी करून देण्यात आली असून, २५ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. तर ६७ शेततळी बांधण्यासाठी आतापर्यंत २५ लाख २३ हजार रुपयांचा निधी शेतक-यांना वितरीत करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा डोंगराळ भागात द-याखो-यांमध्ये वसलेला आहे. कोकणात सर्वाधिक पाऊस पडूनसुध्दा पावसाचे पाणी साचून न राहता तीव्र उतारामुळे वाया जाते. जिल्ह्यात एकूण ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. ही भातलागवड संपूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. तर खरीप हंगामात भाताबरोबर फळभाज्यांचेही उत्पन्न घेतले जाते. आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये भाताची काढणी झाल्यानंतर रब्बीच्या पिकांची तयारी केली जाते.
यावेळी नदीकाठच्या ओलसर जमिनीवर पावटा, कुळीथ, कडवा, तूर, तसेच भाजीपाला आदी पिके घेण्यात येतात. या पिकाला अधूनमधून नदी अथवा विहिरीचे पाणी दिले जाते. एकूणच पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणीच शेती करण्यात येते. शेतकरी जागृत होऊ लागले असून, त्यांच्याकडून ऊन्हाळी भात, भाजीपाला, कलिंगडाची लागवड करण्यात येत आहे.
जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, यातील ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. तर ९१ हजार ५०३ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, यातील ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. याशिवाय नारळ व अन्य बागायतीदेखील फुलवण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश लागवड ही डोंगरउतारावर करण्यात आली आहे. कातळावरील लागवडीसाठी पाण्याची आवश्यकता भासते. अनेकांनी बागायतीमध्ये दूरवरून वाहिनी टाकून पाण्याची व्यवस्था केली आहे.
परंतु, बहुतांश लागवड ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. जिल्ह्यातील फलोत्पादन बहरावे व येथील शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी साठवून त्यावर शेती फुलवावी यासाठी शासनाकडून ‘शेततळी’ हा पर्याय सूचवण्यात आला आहे. यासाठी चौरस आकारातील खोल खड्डा खणून अथवा रिकाम्या चिऱ्याच्या खाणीवर प्लास्टिकच्या जाड कागदाचे आच्छादन पावसापूर्वी टाकण्यात आल्यानंतर पावसाचे पाणी साचून हे शेततळे भरते.
या शेततळ्यातील पाण्याचा वापर शेतीसाठी केला जाऊ शकतो. ही शेततळी कोकणासाठी फायदेशीर ठरली आहेत, त्याप्रमाणे नुकसानदायकही ठरत आहेत. कडक ऊन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने शेततळ्यातील पाण्याची पातळी कमी होते. शेततळ्यासाठी जेवढा खर्च केला जातो, त्या तुलनेत पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे ऐन ऊन्हाळ्यात शेततळ्यामध्ये खडखडात असतो.