शोभना कांबळेरत्नागिरी : रत्नागिरीचेजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महिनाभरापूर्वी कार्यभार हातात घेताच मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील शासकीय कार्यालये, रूग्णालये तसेच काही वास्तूंना भेटी देण्याचा धडाका लावल्याने आता अनेक कार्यालयांनी साहेब कधीही आपल्या कार्यालयात थडकतील, याचा धसका घेतला आहे. प्रत्येक अधिकाऱ्याची काम करण्याची स्वतंत्र अशी वेगळी शैली असते, त्यामुळे तो अधिकारी बदलून गेला तरी त्याची ती विशिष्ट शैली नागरिकांच्या स्मरणात रहाते.
पहिल्यांदा त्यांनी शासकीय तंत्रनिकेतनला भेट देऊन तिथली कार्यालये, गळक्या इमारती, विद्यार्थी - विद्यार्थीनींच्या दुरवस्था झालेली वसतीगृहे यांची पाहाणी केली. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांशीही हितगुज करताना त्यांना येथील समस्या अधिकच जाणवल्या. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आपल्या समस्या समजून घेत आहेत, या भावनेने त्या मुलांनाही कमालीचा आनंद झाला होता.
या कालावधीत त्यांनी काही शाळांचीही पाहाणी केली. तिथल्या छोट्या मुलांशी मनमोकळा संवाद साधला. कार्यालयांना भेटी दिल्यानंतर त्यांनी आवश्यक असलेल्या काही सूचनाही त्यांना केल्या. जिल्हाधिकारी यांनी सोबतीला कोणतीही यंत्रणा न घेता, एकट्याने जावून पाहाणी करण्याच्या या घटना आत्तापर्यंतच्या रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्या आहेत.जिल्हाधिकारी कुठल्याही क्षणी आपल्या कार्यालयात येवून थडकतील, हा धसका मात्र, इतर कार्यालयांनी घेतला आहे. त्यामुळे या भीतीने ही कार्यालये आपले कामकाज योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न करू लागली आहेत, हा सकारात्मक बदलही लक्षात घ्यायला हवा.
आताही तालुक्याच्या दौऱ्यावर जाऊन तिथली पाहाणी करून ते समस्या समजावून घेत आहेत. नागरिकांनी आपल्या पर्यंत समस्या आणाव्यात यापेक्षाही आपण त्यांच्यापर्यंत अधिकाधीक पोहोचून त्या समजून घ्याव्यात, या त्यांच्या तळमळीला दाद द्यायलाच हवी.एकंदरीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे सुरूवातीचे मॉर्निंग वॉक रत्नागिरीतील विविध समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास फलद्रुप ठरले असून आता या समस्या लवकर सुटाव्यात तसेच शासकीय कार्यालयांच्या कामकाजात सकारात्मक बदल व्हावेत, अशी अपेक्षा सामान्य रत्नागिरीकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.