रत्नागिरी : राज्यातील प्रत्येक गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले पाहिजे, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्णत्त्वाच्या मार्गावर असताना तिसऱ्या टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी टंचाईग्रस्त गावांचीच निवड करण्यात आली आहे. परंतु, बंधारे बांधकामासाठीचे निकष हे कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता, राज्यासाठी एकसारखेच तयार केल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील कामे रखडण्याची शक्यता आहे.तिसऱ्या टप्प्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ४० गावांची निवड करण्यात आली असून, यासाठी १८ कोटी १६ लाख २८ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. १ हजार ४२६ कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विकास माथा ते पायथा या तत्त्वावर गावांची निवड करून वरच्या भागात ७० टक्के क्षेत्र व खालच्या भागात ३० टक्के विकासाची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडे१ हजार २७७ कामांचे उद्दिष्ट असून, १५९१.३० हेक्टर क्षेत्रावरील या कामांसाठी १२ कोटी ९६ लाख ९६ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे ७० कामांचे उद्दिष्ट असून, ४ कोटी ७० लाख ४३ हजार रूपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडे अवघी तीन कामे सुपूर्द करण्यात आली असून, त्यासाठी ३ लाख ४० हजारांचा निधी मंजूर केला आहे. पंचायत समिती कृषी विभागाकडे ७६ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ४४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.रत्नागिरी तालुक्यातील कामांसाठी १ कोटी ४४ लाख ५२ हजारांचा निधी, लांजा तालुक्याकरिता १४३ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी २ कोटी ६५ लाख २५ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राजापूर तालुक्यातील ९८ कामांसाठी १ कोटी २२ लाख २६ हजारांचा निधी मंजूर केला आहे.
चिपळूण तालुक्याला १९५ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी २ कोटी ७३ लाख ६८ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. गुहागर तालुक्यामध्ये एकूण ११६ कामे करण्यात येणार असून, त्यासाठी १ कोटी ३० लाख ५० हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. संगमेश्वर तालुक्यासाठी २०२ कामांचे उद्दिष्ट असून, २ कोटी २५ लाख १९ हजार रूपयांची निधी मंजूर झाला आहे.दापोली तालुक्याला एकूण ९९ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी १ कोटी ३२ लाख ४८ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. खेड तालुक्याकरिता एकूण २७८ कामांचे उद्दिष्ट असून, ४ कोटी १५ लाख २ हजाराचा निधी त्यासाठी मंजूर केला आहे. मंडणगड तालुक्यातील ५५ कामांसाठी १ कोटी ७ लाख ३८ हजार रूपये इतका निधी मंजूर झालाआहे.तीव्र उतारामुळे पाणी अडविणे कठीणजलयुक्त शिवार अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या एका बंधाऱ्यात एक दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होत असेल तर त्यासाठी ८० हजार रूपये खर्च करण्याचा निकष लावण्यात आला आहे. साधारणत: सिमेंट नालाबांध बांधण्यासाठी जर १० ते १५ लाख रूपये खर्च करण्यात आले तर त्यामध्ये दहा दक्षलक्ष घनमीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. मात्र, कोकणात तीव्र उतार आहे. पाणी उंचावरून पडत असल्याने अशाप्रकारे बंधारा बांधणे शक्य नाही.समतल जमिनीमुळे बंधाऱ्याचे काम रखडणारराज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये समतल जमीन असल्याने अशाप्रकारे बंधारे बांधण्यासाठीचा निकष योग्य आहे. या निकषामुळे जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे काम रखडणार आहे. सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम न होता केवळ अनगड दगडी बंधारे, जाळी बंधारे शिवाय वृक्षलागवडसारखी छोटी कामे जिल्ह्यात करण्यात येणार आहेत.