रत्नागिरी : जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी सर्व तालुक्यांमध्ये तीन दिवसांचा दौरा करून फळबाग लागवडीचा आढावा घेतला. तसेच येथील यंत्रणांच्या समस्या समजून घेतल्या. त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. १० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यास जिल्ह्यातील १५ हजार ३१० शेतकऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेत रोजगारनिर्मिती व गुंतवणूक वाढविण्यासाठी कोकण विभागामध्ये फळबाग लागवडीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी गतवर्षापासून फळबाग लागवडीला प्राधान्य दिले असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीला प्रारंभ केला आहे.
तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मदतीने सुव्यस्थित नियोजन करून ही योजना त्यांनी जिल्ह्यात व्यापक प्रमाणावर राबविण्यास सुरूवात केली. गतवर्षी लागवडीसाठी १० हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. क्षेत्रिय स्तरावर अधिकारी व कर्मचारी यांच्या सुयोग्य समन्वयातून यासाठी लाभार्थी निवडण्यात यशही आले. मात्र, काजू कलमांच्या तुटवड्यामुळे प्रत्यक्ष पाच हजार हेक्टर क्षेत्रावरच लागवड करण्यात आली.गतवर्षाचा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी प्रदीप पी. आणि त्यांच्या चमूने २०१८-१९ सालासाठी दहा हजार हेक्टर क्षेत्रासाठी पुरेशी रोपे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन केले व लाभार्थी निवडीसाठी सुरूवातही केली आहे. या फळबाग लागवडीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी नऊ तालुक्यांचा दौरा केला.
या दौऱ्यात त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एस. जगताप, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आरिफ शहा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र अहिरे सहभागी झाले होते.
यावेळी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांना धारेवर धरताना चांगले काम करणाऱ्या ग्रामसेवक, कृषी सहायक, ग्रामरोजगार सेवक, सरपंच यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले.या दौऱ्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढू लागली असून, १५ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी सकारात्मकता दर्शविली आहे.२ लाख हेक्टर पडिकजिल्ह्यातील एकूण ८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी दोन लाख हेक्टर क्षेत्र पडिक आहे. सध्या जिल्ह्यात ९१ हजार हेक्टरवर काजू तर ६० हजार हेक्टरवर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा व काजू या फळपिकांच्या गुणवत्तेत व उत्पादकतेत राज्यात अव्वलस्थानी आहे. त्यामुळे पडिक असलेल्या २ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी वाव आहे.जिल्ह्यात १०० कोटी होणार गुंतवणूकदहा हजार हेक्टरवर आवश्यक असलेल्या रोपांची उपलब्धता, अनुकुल पाऊस व हिरीरीने योजना राबविणारी स्थानिक स्तरावरील यंत्रणा यांच्या समन्वयातून ही लागवड यशस्वी झाल्यास प्रतिहेक्टरी सुमारे १ लाख ७० हजार याप्रमाणे तीन वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या जमिनीवर फळबाग लागवडीतून जिल्ह्यात सुमारे १०० कोटी एवढी गुंतवणूक पुढील तीन वर्षांच्या काळात होणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे.