मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गतवर्षी लाॅकडाऊन काळात एस. टी. वाहतूक बंद होती. मात्र यावर्षी अत्यावश्यक सेवेअंतर्गत वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. अनलाॅकनंतर आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू करण्यात आली. प्रवासी प्रतिसादानंतर टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागातील वाहतूक वाढविण्यात आली. लाॅकडाऊनपूर्वी रत्नागिरी विभागात २२२ रात्रवस्तीच्या गाड्या सुरू होत्या. सध्या अवघ्या ७० गाड्या सुरू आहेत.
ग्रामीण भागात नोकरदार, विद्यार्थ्यांसाठी रात्रवस्तीच्या गाड्या फायदेशीर ठरत आहेत. मात्र शाळा, महाविद्यालयांचे अध्यापन ऑनलाईन सुरू आहे. त्यातच चाैथ्या टप्प्यातील निर्बंध लागू असल्याने व्यवसाय, उद्योगासाठी वेळेची मर्यादा आहे. ५० टक्के उपस्थितीची अट आहे. एकूणच कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन केले जात असल्यामुळे प्रवासी संख्येत घट झाली आहे. प्रवाशांअभावी एस.टी.च्या फेऱ्यांवर परिणाम झाला आहे.
जिल्ह्यात दैनंदिन १७३ गाड्यांव्दारे ११६४ फेऱ्या सुरू असून, २७ हजार प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे आठ ते नऊ लाखांचे उत्पन्न प्राप्त होत आहे. एकूणच फेऱ्यांची संख्या घटली असल्याने रात्रवस्तीच्याही फेऱ्या कमी झाल्या आहेत. रात्रवस्तीच्या अवघ्या ३१.५३ टक्के वाहतूक सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
कोरोनामुळे लागू केलेले शासकीय निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण मार्गावरील वाहतूक सुरू करणे आवश्यक आहे. मोजक्या फेऱ्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नाईलाजास्तव खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.
- रोहन झगडे, खंडाळा
वाडीवस्तीवर एस.टी.पोहोचली असल्याने शहराशी ग्रामीण भाग जोडला गेला आहे. अनलाॅकनंतर काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्या, तरी त्यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. रात्रवस्तीच्या गाड्यांची संख्याही गणेशोत्सवापूर्वी पूर्ववत होणे अपेक्षित आहे.
- प्रशांत गडदे, जयगड
कोरोनामुळे सध्या चाैथ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. शिवाय शाळा-महाविद्यालयेही बंद आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहूनच जिल्ह्याअंतर्गत तसेच ग्रामीण असो वा शहरी बस वाहतूक सुरू करण्यात येत आहे. रात्रवस्तीच्या गाडीसाठी ग्रामीण भागातून जशी मागणी होत आहे, त्याप्रमाणे वाहतूक सुरू करण्यात येत आहे. सध्या एस.टी.वाहतूक निम्म्यापेक्षा कमी सुरू असली, तरी टप्प्याटप्प्याने वाहतूक वाढविण्यात येत आहे.
- सुनील भोकरे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.