देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर - बौद्धवाडी येथील ग्रामस्थांची सतर्कता व सहकार्यामुळे गोवा बनावटीची ३ लाख रूपये किमतीची दारू वाहनासह ताब्यात घेण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला यश आले. वाहनाचा चालक फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांना चकवा देणारी ही गाडी पकडण्यात ग्रामस्थांची भूमिका महत्त्वाची ठरली.गोवा बनावटीची दारू घेऊन क्वॉलीस गाडी संगमेश्वरच्या दिशेने जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीनुसार पाठलाग करत उत्पादन शुल्क विभाग शृंगारपूर - बौध्दवाडी येथे उभ्या राहिलेल्या क्वॉलीस गाडीपर्यंत पोहोचले. ग्रामस्थांच्या सहकार्यातून पंचनामा करून उत्पादन शुल्क विभागाने मुद्देमाल रत्नागिरी येथे नेला. आरोपीचा शोध घेण्यापूर्वीच उत्पादन शुल्क विभागाने वाहन जप्त केले.स्थानिक ग्रामस्थ आणि संगमेश्वर पोलिसांच्या मदतीने क्वॉलीस गाडी उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतली. याची कोणतीही नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात केली नाही. तसेच आरोपीला शोधण्यासाठीही संगमेश्वर पोलिसांची मदतही घेतली नाही.
दरम्यान, उत्पादन शुल्क विभाग, ग्रामस्थ हे घटनास्थळावरून दूर झाल्यावर आरोपी जंगलातून खाली उतरून पळ काढत होता. हे ग्रामस्थांनी पाहून आरोपीला पकडले. याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आली. यानुसार आरोपीला रत्नागिरी येथे घेऊन येण्याच्या सूचना केल्या.याप्रमाणे संशयित आरोपी धीरज चव्हाण याला शृंगारपूर येथील ग्रामस्थांनी पोलीसपाटील राजेंद्र पांचाळ व भरत घडशी यांच्या ताब्यात दिले. संशयिताला दुचाकीवरून कारभाटले गावापर्यंत आणले. सुनील पवार, विलास मालप हे संशयिताला संगमेश्वर पोलीस स्थानकात घेऊन जात असताना उत्पादन शुल्क विभागाने त्याला थेट रत्नागिरीला घेऊन येण्याच्या सूचना केल्या. मात्र, वाटेत त्याने सर्वांच्या हातावर तुरी दिल्या. त्यामुळे उत्पादन शुल्काला केवळ दारूसह वाहनच ताब्यात घेण्यात आले.शौचालयातून पलायनखासगी वाहनाने रत्नागिरीत नेत असताना त्याने भूक लागल्याचे सांगितले. संशयित आरोपीसह ग्रामस्थ धामणी येथील हॉटेलमध्ये गेले. पुन्हा वाहनात बसण्यासाठी जात असताना त्याने आपल्याला शौचाला झाल्याचे कारण पुढे केले. तो शौचालयात गेला, त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी ग्रामस्थही उभे राहिले. याचवेळी वीज पुरवठा खंडित झाला. याचा फायदा उठवत त्याने शौचालयाच्या मागील बाजूच्या खिडकीतून थेट पलायन केले. बराच उशिराने ग्रामस्थांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आले.पाईप टाकून रस्ता अडविलाउत्पादन शुल्कच्या रत्नागिरी विभागाला गोवा बनावटीची दारूची क्वॉलीसमधून चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. अधिकाऱ्यांनी गाडीचा पाठलाग सुरू करून चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला होता. मात्र, गाडी संगमेश्वरच्या दिशेने वेगाने पळविण्यात आली.
चालकाने आधी कडवई मग संगमेश्वर, नंतर तुरळ, देवरूखमार्गे गाडी नेली. त्यानंतर मुचरीमार्गे वळवून गाडी कळंबस्तेच्या दिशेने नेली. शृंगारपूरला ही गाडी ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात आली.