चिपळूण : आॅनलाईन जाहिरातीवर क्लिक करुन पैसे कमवण्याचा फंडा गुंतवणूकदारांच्या चांगलाच अंगाशी आला असून, चिपळूण पोलिसांनी ईडूचा संचालक रविकिरण याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून सायबर क्राईमच्या कर्मचाऱ्यांना बोलावून ईडूच्या सर्व संगणकांची तपासणी करण्यात आली. दिवसभर पोलिसांची धावपळ सुरु होती. पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्याकडे हा तपास असल्याने सायबर क्राईमच्या कर्मचाऱ्यांनी तपासासाठी आवश्यक असणारी माहिती उपलब्ध करुन दिली आहे. दुपारनंतर रविकिरण याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.ईडूच्या लॉगिन आयडीच्या माध्यमातून १० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रति जाहिरात ७ रुपये मिळणार होते. या पद्धतीनुसार २ आयडीवर १ हजार रुपये मिळतील, असे सांगण्यात आले होते. ही गुंतवणूक चेन व बायनरी स्वरुपाची असून, जेवढे आयडी होतील तेवढा फायदा होईल, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे जादा पैसे मिळण्याचा मोह गुंतवणूकदारांना झाला. त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. काहींनी तर दागिने गहाण ठेवून पैशांच्या लोभापायी गुंतवणूक केली.
सुरुवातीच्या काळात काही लोकांना या कंपनीकडून चांगला नफा मिळाला. त्यामुळे वर्षभरात कंपनीचा बोलबाला झाला व जादा पैशांच्या आमिषाने लोकांनी गुंतवणूक केली. आता कंपनीवर गुन्हा दाखल झाल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परंतु, कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपले पितळ उघडे पडू नये म्हणून अनेक गुंतवणूकदार तोंड लपवून बसले असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मिसर करीत आहेत.पोलिसांवर विश्वास नाहीईडूसारख्या अनेक मार्केटिंग कंपन्या आतापर्यंत आल्या आहेत. एकाही कंपनीचे कार्यालय आज दिसत नाही. सुरुवातीला मोठा फायदा दिसतो व त्यानंतर पदरी तोटा येतो व निराशा होते, असे अनेक प्रकार आतापर्यंत उघडकीस आले आहेत. असे असताना लोक मोहाला बळी पडतात. अशा बोगस कंपन्यांवर विश्वास ठेवू नये, यासाठी आपण दोन ते तीनवेळा बैठका घेतल्या. परंतु, लोक पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवत नाहीत, हे दुर्दैव आहे, असे मिसर म्हणाले.आयुष्यभराची पुंजीचेन पद्धतीने ग्राहक गोळा करुन त्याचा लाभ मिळवून देणाऱ्या अनेक कंपन्या आतापर्यंत येऊन गेल्या. सुरुवातीच्या काळात या कंपन्या पहिल्या ग्राहकाला त्याचा फायदा करुन देतात. त्यामुळे साहजिकच गुंतवणूकदारांचा कंपनीवर विश्वास बसतो. आज पैसे हेच सर्वस्व झाल्याने पैशाचा मोह सर्वांना पडतो व आपल्याला जादा पैसे मिळावेत, या अपेक्षेने आपली आयुष्यभराची पुंजी लोक अशा कंपनीत गुंतवताना दिसतात.गुंतवणूकदारांची गर्दीईडू अॅण्ड अर्न कन्सलटन्सी या कंपनीचे संचालक रविकिरण बटुला यांच्याविरुध्द मंगळवारी सायंकाळी इम्तियाज मुकादम यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांचा तपास सुरु केला.
दरम्यान, ईडूवर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा सुरु होताच गुंतवणूकदारांना धक्का बसला. या गुंतवणूकदारांनी दुपारपर्यंत ईडूच्या कार्यालयासमोर गर्दी केली. यावेळी संचालक रविकिरण बटुला हे घटनास्थळी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तातडीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.