रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. यावर्षी उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. सोमवारी ६४ हजार १५७ आंबा पेट्या विक्रीला गेल्या होत्या. मंगळवारी एपीएमसी मार्केट, वाशीमध्ये ३५ हजार ७१२ आंबा पेट्या विक्रीला होत्या.
रविवारी मार्केटला सुटी असल्याने सोमवारी आवक वाढली होती. मात्र, मंगळवारी पुन्हा आवक घटली आहे. गतवर्षी याच दिवसात ६५ ते ७० हजार आंबापेट्या विक्रीला होत्या. सध्या पेटीला दर १ हजार ते ३ हजार देण्यात येत असला तरी गतवर्षी हा दर एक हजार ते २५०० रूपये इतका होता.यावर्षी सुरूवातीपासूनच नैसर्गिक बदलामुळे आंबापीक उत्पादन संकटात आले आहे. थ्रीप्स, तुडतुडा यामुळे आंबापीक धोक्यात आले. अति दव व कडाक्याचे ऊन यामुळे आंबा मोहोराचा कोळसा झाला. बागा काळ्या पडल्या व फळे गळून गेली. ज्या शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा वापर करून पीक वाचवले, त्यांचाच आंबा बाजारात आला आहे.
एकाच हंगामात तीन ऋतूंचा अनुभव आला आहे. मार्चपासूनच मे महिन्याप्रमाणे उष्म्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. रत्नागिरीचे तापमान ३७ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर २३ अंश किमान असल्यामुळे ‘फळांचा राजा’ लवकर तयार होऊ लागला आहे. उष्म्यामुळे काही ठिकाणी आंब्यावर काळे डाग पडून आंबा भाजत आहे.
भाजलेल्या आंब्याला मागणी नाही. शिवाय कैरीदेखील गळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. उष्णतेने देठ वाळत असल्यामुळे आंबा गळून पडत आहे. कातळावरील बागांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. वाढलेली उष्णता शिवाय कातळ तापत असल्यामुळे जमिनीतील उष्णतेमुळे आंब्याचा दर्जा घसरत आहे.गतवर्षी याच हंगामात ६५ ते ७० हजार पेट्या विक्रीला उपलब्ध होत्या. मात्र, यावर्षी प्रमाण निम्म्यापेक्षा कमी आहे. मंगळवारी २१९ ट्रक व टेम्पोव्दारे ३५ हजार ७१२ पेट्या विक्रीला आल्या होत्या. महाराष्ट्राबाहेरून ३१ ट्रक व टेम्पोतून ९ हजार ८१९ बॉक्सेस विक्रीला होते. कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू येथून हापूस, लालबाग, बदामी, केशर आदी प्रकारचा आंबा विक्रीला येत आहे.
यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा उत्पादनासाठी केलेला खर्च भरून काढणे अवघड झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा काढणी केली असली तरी किरकोळ स्वरूपातच आंबा काढणी सुरू आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तयार होण्याची शक्यता आहे.
ओखी वादळ, अवकाळी पाऊस, पुनर्मोहोर, वाढता उष्मा यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला असून, बहुतांश शेतकऱ्यांनी आंबा नसल्यामुळे नेपाळी कामगारांना परत पाठवले आहे. ठराविक शेतकऱ्यांकडे आंबा असला तरी त्याचे प्रमाण कमी आहे.
विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत आंबा बाजारात आला असला तरी खतव्यवस्थापनापासून आंबा बाजारात पाठवेपर्यंत प्रचंड खर्च झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आंबा उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दर स्थिर राहणेच आवश्यक होते. वास्तविक आतापर्यंत दरात घसरण झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत केवळ ५०० रूपयांचा फरक आहे. परंतु गतवर्षी उत्पादन चांगले होते. काही शेतकऱ्यांकडे तर आंबाच नसल्यामुळे हताश झाले आहेत. गुढीपाडव्यापासून मार्केटची आवक पाहता आता घट सुरू झाली आहे. दि. २० एप्रिल ते दि. १० मेपर्यंत आंबा काढणीला ब्रेक मिळणार आहे. आंबा पिकातील प्रचंड घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी नव्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.- राजन कदम,आंबा बागायतदार, रत्नागिरी.
केवळ आखाती प्रदेशात निर्यातगतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दर चांगला असला तरी उत्पादनातच प्रचंड घट झाली आहे. सध्या युरोपीय व अन्य देशवगळता केवळ आखाती प्रदेशात निर्यात सुरू झाली आहे. आखाती देशातून आंब्याला मागणी होत आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने त्या तुलनेत निर्यातीसाठी पुरवठा केला जात नाही. स्थानिक बाजारपेठेत ८०० ते १००० रूपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. दि. २५ एप्रिलपर्यंत हेच दर राहतील, असे विक्रेते सांगत आहेत.परराज्यातील आंबा आवककोकणाबरोबर कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमधून दररोज आवक होत आहे. हापूस १०० ते १४० रूपये किलो, लालबाग १०० ते ११० रूपये किलो, बदामी १३० ते १५० रूपये किलो, केशर १४० ते १५० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. मार्केटमध्ये एक हजार ते तीन हजार रूपये पेटीला दर असला तरी मुंबई उपनगर व अन्य भागात तोच आंबा एक हजार ते १२०० रूपये डझन दराने विकण्यात येत आहे.