रत्नागिरी : तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांनी रत्नागिरीतून बदलून जाण्यापूर्वी सरकारी बंगल्याला कुलूप ठोकले होते आणि किल्ली आपल्याकडेच ठेवली होती. अनेक महिने वाट पाहून अखेर विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह पंचांसमक्ष त्या बंगल्याचे कुलूप तोडले.शासकीय बंगला असूनही विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांना अन्य ठिकाणी राहावे लागत होते. शासकीय बंगला रिकामा करून तो ताब्यात मिळावा, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली होती.
तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी बदली झाल्यानंतर तो रिकामा करणे अवश्यक होता. मात्र, त्या बंगल्यातून आपले सामान अन्य ठिकाणी न हलवता, उलट बंगल्याला कुलूप ठोकून ते किल्लीही घेऊन गेले.दरम्यानच्या कालावधीत अनेकदा डॉ.बोल्डे यांना पत्र पाठवून बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे डॉ.फुले पदभार स्वीकारल्यानंतर गेले सहा महिने शासकीय बंगल्यात प्रवेश करू शकल्या नव्हत्या.
बंगला रिकामा न झाल्याने डॉ.फुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह बांधकाम विभागालाही कळविले होते. अखेर बुधवारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पंचासमक्ष या शासकीय बंगल्याचे कुलूप फोडले. त्यानंतर, या बंगल्यातून डॉ.बोल्डे सोडून गेलेल्या सामानाचा पंचनामा करण्यात आला.