रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कन्या वन समृध्दी योजनेची पहिली मानकरी रत्नागिरी तालुक्यातील चाफे - वरचीवाडी येथील माधवी मोहन मांजरेकर यांची कन्या ठरली आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागातर्फे मांजरेकर कुटुंबाला दहा रोपे भेट देण्यात आली असून, मांजरेकर कुटुंबियांनी त्यांच्या जागेत या झाडांची लागवड केली आहे.चाफे - वरचीवाडी येथील माधवी मांजरेकर यांच्या सर्व्हे क्रमांक १४२/२ या क्षेत्रात वनीकरण विभागाने दिलेल्या साग, काजू, आंबा, जांभूळ अशा दहा रोपांची लागवड करण्यात आली आहे. वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेत्तर क्षेत्र वृक्षलागवडीखाली आणण्याबरोबरच ज्या शेतकरी कुटुंबांमध्ये मुलगी जन्माला येईल, अशा दाम्पत्यांना दहा रोपे विनामूल्य दिली जाणार आहेत. पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इत्यादीबाबत सध्याच्या व भावी पिढीमध्ये आवड व रूची निर्माण करण्याचा उद्देश यामागे आहे.या योजनेतून मुलगा आणि मुलगी समान असून, महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी सामाजिक संदेश देणे, मुलींच्या घटत्या संख्येवर अशा योजनांद्वारे काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे हादेखील कन्या वन समृध्दी योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाव नोंदणी केल्यानंतर विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते.
ज्या शेतकरी दाम्पत्याला मुलगी होईल, त्या दाम्पत्याने मुलीसाठी तिच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यात दिनांक १ ते ७ जुलैअखेर दहा झाडे लावण्याची संमत्ती अर्जाद्वारे द्यावी. तसेच वृक्षारोपणासाठी दहा खड्डे खोदून ठेवणे आवश्यक आहे.सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेतून या दाम्पत्याला दहा रोपे ग्रामपंचायतीमार्फत दिली जाणार असून, त्यामध्ये पाच साग रोपे, दोन आंबा रोपे, फणस, जांभूळ, चिंच यांचे प्रत्येकी एक रोप दिले जाणार आहे. लागवडीनंतर या रोपांचे फोटो काढून शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीला सादर करावयाचे आहेत.
ग्रामपंचायतींनी ही सर्व माहिती एकत्रित करून तालुकास्तरावरील वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण विभाग यांना दिनांक ३१ जुलैपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न हे मुलीचा कौशल्य विकास, उच्चशिक्षण आणि रोजगार मिळवणे व मुलींच्या उज्वल भविष्यासाठी शेतकºयांना त्यांच्या ऐच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा राहणार आहे.