रत्नागिरी : रत्नागिरी शहरामध्ये राहणाऱ्या व घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशानुसार ९ डिसेंबर २०१८ पासून जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये आकिब जिक्रिया वस्ता (२१, राजिवडा), मकबुल सलाउद्दीन दावत (१९, राजिवडा, रत्नागिरी), उजैफ तन्वीर वस्ता (१९, राजिवडा, आदमपूर, रत्नागिरी), मोहम्मद अदनान इरफान वस्ता (१९, लिमयेवाडी, कर्ला, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. त्यांना रविवारी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी शहर पोलीस स्थानकाला परिणामकारक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुन्हेगारांची अद्ययावत यादी पोलिसानी बनवली.
त्यानुसार रत्नागिरी शहराअंतर्गत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या कारवाईअंतर्गत या चार जणांच्या टोळीला जिल्ह्यातून हद्दपार करावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव शहर पोलीस स्थानकातून जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आला होता.त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी आवश्यक चौकशी केली व या टोळीच्या हद्दपारीची शिफारस केली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रविवारी या टोळीची हद्दपारी जाहीर करून गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.