शोभना कांबळेरत्नागिरी : बालकामगार आणि प्राण्यांचा वापर या कारणावरून सर्कस हा सर्वांच्या आवडीचा खेळ नामशेष होऊ लागला असून, अनेक नामांकित सर्कस बंद पडल्या. मात्र, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दुर्दम्य इच्छाशक्तीतून माडग्याळ (ता. जत, जि. सांगली) या खेड्यातील कैकाडी समाजातील प्रकाश माने स्वत:ची सर्कस चालवून आपल्यासोबतच कुटुंब आणि १०० कलाकारांची कशीबशी गुजराण करीत आहेत. माने यांची चौथी पिढीही यात कार्यरत आहे.सन १९३७मध्ये दुष्काळ पडला. सर्वत्र जनता अन्नान्न करत होती. जगण्याचे साधन म्हणून प्रकाश माने यांचे आजोबा रामाप्पा एका सर्कसमध्ये काम करू लागले. थोड्या दिवसांनी आजोबांनी स्वत:ची सर्कस सुरू केली. आजी सर्कसच्या लोकांसाठी जेवण बनवत असे.
या सर्कसमध्ये प्रकाश माने यांचे वडील महादेव माने अकरा वर्षांचे असतानाच काम करू लागले. त्याचबरोबर त्यांचे दोन काका आणि आत्याही काम करू लागली. या काळात माने कुटुंबाला चांगल्या तऱ्हेने स्थैर्य मिळाले. मात्र, आजोबांच्या निधनानंतर प्रकाश माने यांच्या काकांनी सर्कस ताब्यात घेतली. त्यामुळे प्रकाश माने यांच्या वडिलांवर दुसऱ्या सर्कसमध्ये काम करण्याची वेळ आली.प्रकाश माने दोन वर्षांचे होते. सर्कसचा खांब उचलताना तो वडिलांच्या अंगावर पडला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पितृछत्र हरपले, पण त्याचबरोबर त्यांच्या आईवर पुन्हा काबाडकष्ट करण्याची वेळ आली. प्रकाश माने निरक्षर असल्याने दुसऱ्या ठिकाणी काम करणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनीही आपल्या आधीच्या दोन पिढ्यांचा वारसा तसाच चालू ठेवला.त्यामुळे चार - पाच वर्षांपासूनच तेही सर्कसमध्ये काम करू लागले.सन १९९३मध्ये त्यांनी जिद्दीने न्यू गोल्डन ही सर्कस काढली. ही सर्कस तब्बल १७ वर्षे चालविली. मात्र, शासनाने सर्कसमध्ये काम करण्यास प्राण्यांवर, मुलावर बंदी आणली. याचा फटका माने यांना बसला. त्यांच्याकडील सिंह, घोडे शासनाने उचलून नेले. एक हत्ती होता तो त्यांनी मंदिराला देऊन टाकला.
अखेर कर्ज वाढल्याने ही सर्कस गुजरातमधील माणसाला विकली. त्यानंतर २०११ साली त्यांनी जिद्दीने सुपर स्टार ही सर्कस काढली. यात सध्या १०० कलाकार काम करीत आहेत. प्राणी नसल्याने प्रेक्षक सर्कसकडे फिरकतच नाहीत. सर्व कलाकारांचे पगार, त्यांचा खर्च यासाठी दररोज त्यांना ४२ हजार रूपये उभे करावे लागत आहेत.
सर्कस चालवताना सध्या प्रकाश माने यांच्या जीवनाची सर्कस झाली आहे. तरीही ते आपल्या तीन मुलांचे शिक्षण करीत आहेत. एकेकाळी गावात सर्कस येण्याची वाट लोक पाहायचे आणि आता सर्कसचालक लोकांची वाट पाहतात, असे उलट चित्र दिसत आहे.सर्कसमध्येच प्राणीबंदी का?चित्रपट किंवा जाहिरातीत लहान मुले तसेच प्राणी यांचा सर्रास वापर होत आहे. त्यावर शासनाने अद्याप बंदी आणलेली नाही. मात्र, सर्कसमध्ये काम करणारी लहान मुले आणि सिंह, हत्ती, घोडे, पोपट, श्वान यांच्या वापरावर बंदी आणली. झुल्यावरील कसरती, विविध प्राण्यांचे खेळ यामुळे सर्कस आबालवृद्धांचे आकर्षण होती.रशियन, आफ्रिकन कलाकारपूर्वी रॉयल सर्कस जगप्रसिद्ध होती. यात प्रकाश माने यांच्या आत्येने सहा वर्षे काम केले. रशिया या सर्कसला खूपच प्रतिसाद मिळाला. मात्र, शासनाने प्राण्यांवर बंदी आणल्याने आता ही सर्कसही बंद पडली. मात्र, कर्जाचा डोंगर उभा असतानाही निरक्षर असलेल्या प्रकाश माने या मराठी माणसाने ह्यसुपर स्टारह्ण ही १०० कलाकारांची सर्कस सुरू ठेवली आहे. यात रशियन, आफ्रिकन, आसाम, मेघालय, मणिपूर येथील कलाकारांचा समावेश आहे.आम्ही शिकलो नाही तरी...या सर्कसचे कार्यक्रम महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, गुजरात, आंध्र, छत्तीसगड, राजस्थान आदी राज्यांमध्ये झाले आहेत. मात्र, दिवसेंदिवस सर्कसला उतरती कळा लागल्याने भविष्यात हे सामान भाड्याने देण्याची मानसिक तयारी केल्याचे ते सांगतात. माने यांच्या तीन पिढ्या शिकल्या नसल्या तरी ते बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीचे असल्याने आता यापुढे आपली मुले शिकायला पाहिजे, या विचाराने प्रेरित होऊन ते तीन मुलांचे शिक्षण करीत आहेत.
सर्कसला राज कपूर यांच्या मेरा नाम जोकरने प्रतिष्ठा मिळवून दिली होती. मात्र, आता शासनाने प्राणी, बालकामगार तसेच जागेबाबत जाचक अटी घातल्याने हा खेळच नामशेष होऊ पाहतोय. या अटींमध्ये थोडी शिथिलता आणल्यास ज्या काही सर्कस तग धरून आहेत, त्यांना उर्जितावस्था मिळेल आणि त्यातील कलाकारांचीही उपासमार होणार नाही.-प्रकाश माने,सर्कस मालक