विहार तेंडुलकररत्नागिरी : रत्नागिरीचे तापमान पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कमी असले तरी रत्नागिरीकरांना सध्या जगणे नकोसे झाले आहे. गेल्या काही दिवसात वाढत्या उष्णतेपेक्षा वाढलेल्या आर्द्रतेने रत्नागिरीकरांना घाम फोडला आहे. रत्नागिरीत सद्यस्थितीत आर्द्रतेचे प्रमाण हे ७५ ते ८० टक्के यादरम्यान आहे. त्यामुळे पंखे असूनही रत्नागिरीकर घामाने त्रस्त झाले आहेत.बऱ्याचवेळा रत्नागिरीत किती ही उष्णता? अगदी जीव नकोसा झालाय..असे उद्गार ऐकावयास मिळतात. पण प्रत्यक्षात घाम हा उष्णतेमुळे नव्हे तर आर्द्रतेमुळे येतो. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मे महिन्यातही रत्नागिरीचे कमाल तापमान हे ३७ तर किमान तापमान हे २६ अंश सेल्सिअस एवढे आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हे तापमान कमी असले तरीही आर्द्रता वाढल्याने रत्नागिरीकरांना घामाचा त्रास जाणवू लागला आहे.रात्रीच्या काळातही आर्द्रता जास्तसाधारणपणे रात्रीच्या काळात उष्णता ही कमी असते. मात्र, रत्नागिरीत रात्रीचे तापमान कमी असले तरी रात्रीच्या काळात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे रात्रीच्या काळातही गरमीचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी मध्यरात्री २.३० वाजता रत्नागिरीतील आर्द्रतेचे प्रमाण हे ८० टक्के एवढे होते. त्यामुळे अन्य ठिकाणी वातावरण थंड असताना रत्नागिरीकरांची रात्र मात्र गरमीतच असल्याचे दिसून आले.आर्द्रता म्हणजे काय?हवेमध्ये पाण्याच्या थेंबाचा अंश मोजणे म्हणजेच आर्द्रता. हे पाण्याचे थेंब एका अदृश्य वायूमध्ये परिवर्तीत होतात. त्यामुळे ते हवेमध्ये प्रत्यक्ष जाणवत नसले तरी हवेत त्यांचे अस्तित्व असते. ज्या हवेत आर्द्रता जास्त, त्याठिकाणी गरमीचे प्रमाण जास्त असते. समुद्रकिनाऱ्याजवळ आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. समुद्रात बाष्पीभवनाचे प्रमाणही जास्त असल्याने त्या परिसरात आर्द्रता वाढते आणि त्यामुळे गरमीचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते.समुद्रानजीकच्या प्रदेशात आर्द्रता जास्तसमुद्राच्या सानिध्यात वसलेल्या शहरांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जो भाग समुद्रापासून लांब आहे, अशा ग्रामीण भागात आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. समुद्राकडून येणारी हवा ही गरम असते. त्याचबरोबर समुद्रात होणाऱ्या बाष्पीभवनाची प्रक्रिया यामुळे या गरम हवेत काही प्रमाणात पाण्याचे अंश असतात. त्यामुळे समुद्रकिनारी वसलेल्या प्रदेशात तापमान कमी आणि आर्द्रता जास्त, असे व्यस्त प्रमाण असल्याचे दिसून येते.काही वर्षातच प्रमाण वाढलेगेल्या काही वर्षात रत्नागिरीत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. उष्णता ज्याठिकाणी जास्त त्याठिकाणी आर्द्रता कमी आणि ज्याठिकाणी आर्द्रता कमी त्याठिकाणी उष्णता जास्त, असे विषम प्रमाण सध्या दिसत आहे. रत्नागिरीत आर्द्रता जास्त असल्यामुळे घामही मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे अखंड वीजपुरवठा असूनही रत्नागिरीकरांच्या घामाच्या धारा काही थांबलेल्या नाहीत.घामाच्या रुपाने पाण्याचे विसर्जनसंपूर्ण महाराष्ट्र उष्णतेमुळे एकीकडे पोळला असला तरी कोकण विभागातील उष्णता ही आर्द्रतेमुळे वेगळी ठरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमान जास्त आणि आर्द्रता कमी असल्याने त्याठिकाणी याकाळात त्वचा भाजून निघते. तर कोकण विभागात आर्द्रता जास्त असल्याने याठिकाणी त्वचेतून घामाच्या रुपाने पाण्याचे विर्सजन होण्याचे प्रमाण जास्त आहे.आर्द्रतेमुळे पातळी ओलांडलीमानवी शरीर हे जवळपास ४० टक्के आर्द्रता असलेल्या हवामानात चांगल्या तऱ्हेने राहू शकते. मात्र, रत्नागिरीची सध्याची आर्द्रता ही ८६ टक्क्यांपर्यंत वाढलेली आहे. यावरूनच हे वातावरण मानवासाठी हळूहळू प्रतिकूल होत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात वाढत जाणारी आर्द्रता ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे.विविध आजारांची लागण
रत्नागिरीच्या वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे घामोळे येऊ शकते. त्याचबरोबर कांजण्या, नायटा, खरूज असे आजार होऊ शकतात. सध्या माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये नायटा, गजकर्ण आदीचे रुग्ण जास्त असतात. याकाळात सैलसर कपडे घालावेत, दिवसातून दोनदा आंघोळ करावी. दर दिवशी केस धुतले पाहिजेत. तसेच अॅण्टीसेप्टीक पावडरचा वापर केल्यास या आजारापासून मुक्ती मिळू शकते.- डॉ. अरूण राठोडकर, त्वचारोगतज्ज्ञ, रत्नागिरी
कातडीतून बाष्पीभवन होतेसाधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण जास्त आहे. रत्नागिरीत उष्णता कमी आणि आर्द्रता जास्त आहे. आपलं शरीर जास्तीत जास्त ४० टक्क्यांपर्यंत आर्द्रता सहन करू शकते. त्यापेक्षा पुढे प्रमाण गेल्यास आजार होतात. दुसरीकडे ज्याठिकाणी आर्द्रता कमी, उष्णता जास्त अशाठिकाणी शरिरातील पाण्याचे प्रमाण हे घटते, कातडीतून बाष्पीभवन होते आणि त्वचा शुष्क बनते. त्यानंतर शरिराच्या आतील भागही पाण्याविना कोरडा होऊ लागतो. त्यामुळे घेरी येणे, अचानक बेशुध्द होणे असे आजार होतात. त्यामुळे सकाळी १० वाजल्यानंतर घराबाहेर न पडणे, हाच एक उपाय आहे.- डॉ. सुधांशु मेहता, त्वचारोगतज्ज्ञ, रत्नागिरी.