रत्नागिरी : शेळ्या चरण्यासाठी रानात गेलेल्या खेडशी -चिंचवाडीतील मैथिली प्रवीण गवाणकर या तरुणीचा मृतदेह रानातील एका बांधावर आढळून आला. बिबट्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तिच्या चेहऱ्याला झालेली दुखापत पाहता तिच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे का, याचा तपासही पोलीस करत आहेत.१७ वर्षीय मैथिली ही अकरावीत शिकत होती. तिचे वडील मोलमजुरी करतात. तिची आई घरीच असते तर तिला एक लहान भाऊ आहे. शुक्रवारी सायंकाळी ती जवळच्याच रानात शेळ्या चरण्यासाठी गेली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. तिचा मृतदेह रानातील बांधाला अडकल्याचे दिसून आले.या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्थानकात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन अधिक तपास सुरू केला आहे. मैथिलीवर बिबट्याने हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र तिच्या चेहऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त होत आहे.
रत्नागिरीत बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 4:58 AM