लांजा : रणरणते ऊन, भयंकर उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे माणसाप्रमाणे जनावरेदेखील पाण्याच्या शोधात फिरत आहेत. अशीच तहानलेली दोन वर्षांची मादी बिबट्या पाणी पिऊन परतत असताना रानटी जनावरांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकली. या बिबट्या मादीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमानंतर पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद केले.वाघ्रट - रांबाडेवाडी येथील काजऱ्याचे पाणी येथील पऱ्याच्या बाजूला डोंगर भागात सुरेश बाळू रांबाडे यांची आंबा, काजूची बाग आहे. याठिकाणी रांबाडेवाडी येथील ग्रामस्थ पिण्याचे पाणी भरण्यासाठी तसेच आपल्या जनावरांना पाणी पिण्यासाठी घेऊन येतात.
शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान चंद्र्कांत पन्हळेकर व संतोष भुवड हे काजू काढण्यासाठी येथील पायवाटेने आपल्या बागेत चालले होते. ते सुरेश रांबाडे यांच्या बागेजवळ आले असता, बिबट्याने या दोघांना पाहून जोरदार डरकाळी फोडल्याने पन्हळेकर व भुवड यांची पाचावर धारण बसली.यावेळी त्यांनी आपल्या बागेकडे न जाता, आपापल्या घरी धूम ठोकली. त्यानंतर हा..... हा...... म्हणता बिबट्याची माहिती गावात पसरली. वाघ्रट येथील उद्योगपती सुदाम कामत यांना बिबट्याची माहिती मिळताच, त्यांनी लांजा वन विभागातील कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर लांजा वन विभागाचे परिमंडल वन अधिकारी व्ही. वाय. गुरवळ, वनरक्षक विक्रांत कुंभार, राहुल गुंठे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.
सुरेश रांबाडे यांच्या बागेतील येण्या- जाण्याच्या वाटेवर तोडण्यात आलेल्या एका झाडाच्या खुटाला गाड्यांच्या केबलच्या सहाय्याने रानटी जनावराची शिकार करण्याच्या उद्देशाने अज्ञाताने फासकी लावली होती. बिबट्या मादी येथील पऱ्याचे पाणी पिऊन परतत असताना तिच्या छातीच्या भागाला फासकी आवळली गेल्याने ती अडकली. अथक परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद केल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.पिंजऱ्यात जेरबंदपरिक्षेत्र वन अधिकारी बा. रा. पाटील, राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, वनरक्षक गावडे हे वाघ्रट येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी बागेला असलेली निवडुंगांची झाडे तोडून साधारण पिंजरा कसा लावता येईल, असा प्रयत्न करताना रस्सीचा फास तयार करून बिबट्याच्या पोटाभोवती टाकण्यात आला व त्यानंतर फासकी कोयत्याने तोडण्यात आल्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.