संकेत गोयथळेगुहागर : गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने प्रतिस्पर्ध्यांचे अर्ज बाद झाले. यामुळे राष्ट्रवादीचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. प्रामुख्याने शहर विकास आघाडी व शिवसेनेला याचा फटका बसला. यामुळे पुन्हा एकदा आमदार भास्कर जाधव यांनी राजकीय समयसूचकता दाखवित निवडणुकीच्या प्राथमिक टप्प्यात विजय मिळवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह दुणावला आहे.गेले वर्षभर कुणबी समाजाला एकत्रित करुन समाजाची ताकद दाखविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणबी समाजाचे प्राबल्य असणारे प्रभाग ३, ४, ९, ११, १२, १३, १४ आणि १५ या आठ जागांवरील शहर विकास आघाडीचे उमेदवार हमखास निवडून येतील, असा दावा केला जात आहे. यामधील नेहा नितीन सांगळे प्रभाग ३, वैशाली पराग मालप (प्रभाग ९) व प्रशांत दत्ताराम बोले (प्रभाग १०) हे उमेदवार बाद ठरल्याने निवडणुकीपूर्वीच तीन प्रभाग हातातून निसटले आहेत.कुणबी समाजाच्या नेत्यांमध्ये परिपक्वता नसल्यानेच समाजाला याचा मोठा पराजय पत्करावा लागला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. माजी नगराध्यक्षा स्नेहा जनार्दन भागडे यांना दोनवेळा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली. सर्वांबरोबर स्नेहा भागडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यानंतर राष्ट्रवादीच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याने ही बाब अडचणीची ठरेल, हे लक्षात आल्यानंतर अखेरच्या दिवशी त्यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरला.
प्रभाग १२मधून विकास आघाडीचे उमेदवार माधव साटले याच्या घराचे काम अनधिकृत असल्याचा आक्षेप राष्ट्रवादीच्या उमेदवार संगीता वराडकर यांनी घेतला होता. याचा निकाल माधव साटले यांच्या बाजूने लागला असला तरी पुढील काळात विरोधकांवर बारकाईने लक्ष असल्याबाबतचा हा इशारा असल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे कुणबी समाजाने उर्वरित जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे.भाजपचा विचार करता प्रभाग ३मधून अनघा सुरेश कचरेकर व प्रभाग ९ मधून स्नेहल शांताराम वरंडे यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. या दोन्ही प्रभागात विकास आघाडी व यापूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदान पाहता फार मोठा फरक नव्हता. या जागा गेल्याने भाजपचे फार मोठे नुकसान झाले आहे, अशी स्थिती नाही. मात्र, भाजप हा राष्टीय पक्ष असल्याने नेत्यांनी तत्काळ यंत्रणा हलवून राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली, ते भाजपला शक्य झाले नाही. हे दिसून आले.
निवडणूक अधिकारी कल्पना जगताप यांनी जात प्रमाणपत्र सादर करण्याच्या बदलांना अधिनियमाबाबतची तोंडी माहिती उमेदवारी अर्ज भरताना दिली होती. ही बाब कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतली नव्हती.उमेदवार बिनविरोधसोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भास्कर जाधव यांनी नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी सोपवलेल्या जयदेव मोरे यांच्यामार्फत प्रभाग १मधून माजी नगरसेविका निधी सुर्वे, प्रभाग ६ व १० मधून स्वत: जयदेव मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. येथील तीन प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले, तर प्रभाग ६ व १० भाजपकडे बिनविरोध न होता आता निवडणूक होणार आहे.