- मेहरून नाकाडेरत्नागिरी : जिल्ह्यातील मासेमारीचे मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामे तोडण्याचे काम मंगळवारी (दि.१७) सुरू करण्यात आले. मत्स्य विकास विभाग, पोलिसदल व नगर परिषदेकडून अतिरिक्त बांधकामे पाडण्यात येत आहेत.
मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृतपणे बांधलेल्या ३०३ झोपड्या, शेडसह पक्के बांधकाम केले आहे. बंदरावरची ही सर्व जागा मत्स्य व्यवसाय विभागाच्या मालकीची आहे. त्यानुसार तत्कालीन मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रत्नाकर राजम यांनी बंदरावरील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना दि. १६ ऑक्टोबरपर्यंत हटवण्याची नोटीस बजावली होती. सोमवारी (१६ ऑक्टाेबर) या नोटीसच्या शेवटचा दिवस होता. मात्र, सर्व अनधिकृत झोपड्या, शेड, पक्की बांधकामे न हटविल्याने तशीच होती. विद्यमान मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव आणि मिरकरवाडा प्राधिकरण अधिकारी रत्नाकर राजम यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांची याबाबत भेट घेतली होती . मिरकरवाडा बंदरावरील अतिक्रमण दि. १६ ऑक्टोबरपर्यंत न हटवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले होते शिवाय ध्वनीक्षेपकावरून आवाहनही करण्यात आले होते.
मंगळवारी सकाळी नऊ वाजता पोलिसांनी संचलन केले. त्यानंतर अतिक्रमणे पाडण्यास प्रारंभ करण्यात आला. मच्छिमार समाजातर्फे महिला, पुरूषांकडून विरोध करण्यात आला. मात्र प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामे पाडण्याचे काम दिवसभर सुरूच होते.