रत्नागिरी : वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकाला बसला व दर गडगडले. पावसाने उसंत दिल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबाकाढणी सुरू आहे. २६ ते २८ तारखेपर्यंत यावर्षीचा आंबा हंगाम संपणार आहे.यावर्षी आॅक्टोबरपर्यंत पाऊस होता. मात्र, नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाली व आंबा मोहोराला प्रारंभ झाला. परंतु डिसेंबरमध्ये झालेल्या ओखी वादळामुळे पहिल्या टप्प्यातील आंबापीक नष्ट झाले.
कल्टारसारख्या संजीवकांचा वापर केलेल्या शेतकऱ्यांना आघाडीचे उत्पादन मिळवून देणारा पहिला टप्पाच नष्ट झाला. दुसऱ्या टप्प्यात मोहोर भरपूर झाला. परंतु फळधारणा अत्यल्प झाली. तिसऱ्या टप्प्यात अतिथंडीमुळे मोहोरावर थ्रीप्स, तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. मोहोर काळा पडला. चौथ्या टप्प्यातील मोहोराचा आंबा सध्या बाजारात आहे. यावर्षी शेतकऱ्याना १५ ते १६ वेळा कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्या लागल्या.फेब्रुवारीत दुसऱ्या टप्प्यातील आंबा बाजारात आला. मात्र, त्याचे प्रमाण किरकोळ होते. सुरूवातीला १० हजार रूपये पेटीला भाव देण्यात आला. मात्र, तो अधिक काळ टिकला नाही. सहा ते पाच हजारावर आला.
१५ मार्चनंतरच आंबा बऱ्यापैकी बाजारात येऊ लागला. त्यावेळी तोच दर तीन हजारावर आला. त्यानंतर १० एप्रिलपर्यंत आंब्याचे दर वाशी मार्केटमध्ये स्थिर होते. पुन्हा १० एप्रिलनंतर दर गडगडले. ५ मेपर्यंत १२०० ते १५०० रूपये इतका पेटीला भाव मिळू लागला.
१२ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाला बसला. काही ठिकाणी जोरदार वारे झाल्यामुळे आंबा जमिनीवर आला. त्यामुळे दर पुन्हा घसरले. ८०० ते ७०० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू झाली.
गतवर्षी मे महिन्यात वाशी मार्केटमध्ये एक ते दीड लाख पेटी विक्रीला असायची. मात्र, यावर्षी जेमतेम ५० ते ५५ हजार पेटी विक्रीला होती. जोडून सुट्ट्या आल्याने केवळ एकच दिवस वाशी मार्केटचा आकडा ८० हजारापर्यंत पोहोचला होता. कोकणच्या हापूसप्रमाणे यावर्षी कर्नाटक हापूसचे उत्पादनही अल्प आहे. त्यामुळे हा आंबा विक्रीला कमी असल्याचे विक्रेते सांगत आहेत.यावर्षी मे महिन्यात कॅनिंग व्यवसाय सुरू झाला. निवडक आंबा पेटीत भरल्यानंतर उर्वरित आंबा कॅनिंगला घालण्यात येतो. सुरूवातीला ३० रूपये किलो दराने आंबा खरेदी सुरू झाली. यावर्षी उत्पादन कमी असल्याने दर स्थिर राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सध्या १७ रूपये किलो दराने आंबा खरेदी सुरू आहे.
वास्तविक ५ मेनंतरच आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात आला. उष्णतेमुळे आंबा मोठ्या प्रमाणावर तयार झाल्याने बाजारात आंब्याचे प्रमाण वाढले. परंतु दर टिकून न राहिल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुध्दा निघणे अवघड बनले आहे.हवामानात सातत्याने होत असलेल्या या बदलामुळे किती आंबापीक हाताशी येईल, याची खात्री बागायतदाराला अखेरच्या क्षणापर्यंत नसते. मोहोर मोठ्या प्रमाणात दिसला तरी त्याला फळधारणा होतेच, असे नाही.
औषधे आणि खतांचे वाढलेले अवास्तव दर बागायतदारांना चटका देत आहेत. त्यामुळे आंबा बाग बाळगणे, आंब्याचा व्यवसाय करणे आतबट्ट्याचे झाले आहे. शिवाय हापूसची विक्री व्यवस्था दलालावर अवलंबून आहे.
आंबा बागायतदार दलालाकडे आंब्याच्या पेट्या पाठवतो तेव्हा त्याला दर किती मिळणार हे त्याला माहिती नसतं. आंब्याची विक्री झाल्यानंतरही बागायतदाराला विक्रीचा खरा दर कळत नाही.
हंगाम संपल्यानंतर दलालांकडून बागायतदाराला आलेल्या पट्टीवर पाठवलेल्या पेट्या, पेटीनिहाय दर, एकूण रक्कम, दलाली आणि बागायतदाराच्या हाती पडणारी रक्कम असा हिशोब केलेली ती कागदाची पट्टी जून महिन्यात बागायतदारांच्या हाती पडते.
सोशल मीडियामुळे आता आंब्याचे दर कळू लागले तरी आंब्याचा दर जो दलाल सांगतील तोच अंतिम असतो. आंब्याला हमीभाव मिळत नाही. उत्पादक थेट बाजारात जाऊन आंब्याची विक्री करू शकत नाही. आंबा हे नाशिवंत फळ असल्यामुळे विशिष्ट काळातच त्याची विक्री होणे, ते ग्राहकापर्यंत पोहोचणे गरजेचे असते.एकावेळी कितीही पेट्या पाठवल्या तरी त्या राज्यभरात खपवण्याची दलालांची साखळी असते. अशी साखळी तयार करणे किंवा राज्यभरात ठिकठिकाणी आंबा पाठवणे बागायतदाराला शक्य नाही. त्यामुळे बागायतदाराला दलालावरच अवलंबून राहावे लागते. यावर्षी विविध नैसर्गिक संकटाचा सामना करीत आंबा पिक बाजारात आले परंतु अपेक्षित दर न मिळाल्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा नवीन आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.साखरेप्रमाणे आंब्याला हमीभाव मिळणे गरजेचे आहे. यावर्षी २५ ते ३० टक्के आंबापीक आले आहे. मार्चनंतर आंबा हंगाम सुरू झाला तरी सर्वाधिक आंबा मे महिन्यातच आला. त्यामुळे दर गडगडले. यावर्षी एकूणच उत्पादन कमी असल्याने दर टिकतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.
खत व्यवस्थापन ते आंबा बाजारात येईपर्यंत करावा लागणारा खर्च निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. कँनिगमुळे चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे झाडावरील सर्व आंबा काढण्याची घाई शेतकरी करीत आहेत. मजुराअभावी रखडला तरी मे अखेरपर्यंत आंबा हंगाम संपणार आहे.- राजेंद्र कदम,आंबा बागायतदार, शीळ-रत्नागिरी.
रशिया, युकेत निर्यातमँगोनेट प्रणालीव्दारे गतवर्षी जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा चार हजार २०० किलो आंबा कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला होता. यावर्षी रशियामध्ये ३ हजार ६१० किलो, तर ब्रिटन (युके) मध्ये १ हजार ४१० किलो आंबा निर्यात झाला आहे. सचिन लांजेकर व अनिकेत हर्षे यांचा आंबा निर्यात झाला असून, कृषी अधीक्षक कार्यालयाने आंब्याची तपासणी केली; परंतु डिजिटल सिग्नेचर सर्टीफिकेट नसल्यामुळे फायटो सॅनेटरी तपासणी पुणे येथे करून आंबा निर्यात करण्यात आला.