रत्नागिरी : रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे अॅड. दीपक पटवर्धन, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मिलिंद कीर व मनसेचे रुपेश सावंत यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचवेळी भाजपचे कार्यकर्ते मुकुंद जोशी यांनीही आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक तीन मुख्य स्पर्धकांमुळे तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपदासाठी प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी बुधवारी त्यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करीत दाखल केला होता. ४ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होऊनही प्रत्यक्षात ११ व १२ डिसेंबर या दोन दिवशीच ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. येत्या १८ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे या कालावधीत यातील कोण उमेदवारी माघार घेणार, याची सर्वांना उत्कंठा आहे. २९ डिसेंबर २०१९ रोजी मतदान होणार असून, ३० डिसेंबरला मतमोजणी व निकाल घोषित होणार आहेत.शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत यांच्याकडून राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण रत्नागिरीत राबविण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस आपला उमेदवार रिंगणातून माघारी बोलविणार का, याचीही चर्चा आहे.
रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी एकूण ५ उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:42 PM