रत्नागिरी : काही स्त्रिया आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जणूकाही आकाशाला गवसणी घालू पाहातात. चिपळूण तालुक्यातील चिवेली गावच्या वृषाली बुद्धदास साळवी या महिलेने बारा वर्षे आरोग्यसखी म्हणून काम करतानाच आपल्या दोन मुलांचे परदेशात डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. एका मुलाने अभियांत्रिकी पदविका पूर्ण केली आहे.स्वत: पदवीधर असलेल्या वृषाली साळवी यांची पुढे शिकून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, संसारामुळे ती अपूर्णच राहिली. पती चिवेली येथील हायस्कूलमध्ये कार्यरत असताना मानसिक आघातामुळे पती मनाने खचले. त्यातच पतीच्या एकट्याच्या पगारात मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागणारा नव्हता. त्यांनी पतीच्या विचाराने मार्गताम्हाणे येथे राहायला येण्याचा निर्णय घेतला. येथे आल्यावर त्यांना चिपळूण येथील संवाद संस्थेच्या सुनीता गांधी यांच्या रूपाने आशेचा किरण दिसला.
दोणवलीच्या सरपंच सुशिला पवार यांच्याबरोबर बचत गटातून काम करताना त्या आरोग्य सेविका बनल्या. २००९ साली आशाच्या पदासाठी चिवेली गावानेच वृषाली साळवी यांचे नाव सुचविले. त्यातच मोठा सागर आणि धाकटा शुभम यांना परदेशात जाऊन डॉक्टर व्हायचे होते.
मुलांच्या हुशारीला साथ मिळाली ती कोल्हापूरच्या एका मार्गदर्शकाची. सागर याने रशियात जाऊन वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. विक्रांत याने अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, शुभम अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेत आहे. या प्रवासात पती बुद्धदास साळवी यांची साथही मोलाची असल्याचे त्या सांगतात.