रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय येथे सापडलेल्या आज्जीला माहेर संस्थेमुळे तिचे घर १५ दिवसांत सापडले. आज्जीला सुखरूप पाहून तिच्या परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला.येथील जिल्हा रूग्णालयाच्या अपघात विभागाजवळ सोमवार सकाळपासून सुमारे ६० ते ७० वयाची वृध्द महिला बसून होती. ती निराधार असेल, असे समजून जिल्हा रूग्णालयाकडून माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांना फोन करण्यात आला.
ही महिला निराधार असून तिला डोळ्यांनी दिसतही नाही. तिला माहेर संस्थेत प्रवेश मिळेल का? असे कांबळे यांना विचारण्यात आले. मी १५ मिनिटात रूग्णालयात पोहोचतो, असे कांबळे यांनी सांगितले.ते काहीवेळातच पत्नी विजयाला घेऊन जिल्हा रूग्णालयात पोहोचले. त्यांनी बाकावर झोपलेल्या आज्जीची चौकशी केली. आज्जीने आपली सर्व माहिती सांगितली. तिचे नाव लक्ष्मी तांबे असून ती चांदोर (ता. रत्नागिरी) येथील असल्याची माहिती दिली.
आपण निराधार असून, डोळ्याचे आॅपरेशन करायला दवाखान्यात आले होते, असे सांगितले. तिने आश्रमात राहण्याची तयारी दर्शविली. कांबळे यांनी तिला गाडीत बसवून माहेर संस्थेत आणले.१५ दिवस झाले तरी आजी घरी सोडा, असे म्हणाली नाही. चांदोर हे गाव पावस पूर्णगड पोलीस हद्दीत येत असल्याचे कांबळे यांना कळले. त्यांनी पूर्णगड पोलिसांना या आजीबद्दल माहिती दिली. या पोलीस ठाण्यात लक्ष्मी तांबे या महिलेची बेपत्ता नोंद तिच्या नातेवाइकांनी दिली होती.
आपली सासूबाई मिळाली व ती हातखंबा येथील माहेर संस्थेत आहे, हे समजल्यावर आजीच्या दोन सुना लगेच संस्थेत हजर झाल्या. सुना आपल्याला न्यायला आल्यात, हे पाहून आजीही खूश झाली आणि माहेरने आणखी एक घर जोडून दिले.