मेहरून नाकाडेरत्नागिरी : तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचवत असतानाच पडीक जमिनीवर नाणीज येथील आर. के. डवरी यांनी फळबागायत फुलवली आहे. तसेच भाडेतत्वावर जागा घेऊन त्यामध्ये भात, भाजीपाला, कलिंगडाचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न डवरी यांनी केला आहे.विविध कारणास्तव शेतकरी आपली जागा पडीक ठेवतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना लागवडीसाठी प्रोत्साहित करून शास्त्रशुध्द पध्दतीने फळबाग लागवड कशी करावी. तसेच शेतकऱ्यांना शेतीचे महत्त्व पटवून देतानाच त्यांना प्रत्यक्ष लागवडीसाठी उद्युक्त करण्याचे काम डवरी करीत आहेत.
याशिवाय पाली, पाथरट, नाणीज येथे शेतकऱ्यांकडून जागा भाड्याने घेऊन त्यामध्ये त्यांनी भातपिकाची लागवड केली आहे. भात काढणीनंतर भाजीपाला व कलिंगड पिकाची लागवड डवरी करतात. भाताची लागवड मात्र ते कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त चारसुत्री पद्धतीने करतात. त्यामुळे सगुणा पद्धतीपेक्षा परिसरातील शेतकरी चारसुत्री पद्धतीचाच अवलंब अधिक करू लागले आहेत.
चारसुत्री पध्दतीत उत्पादनही चांगले येत असल्याचे डवरी यांचे मत आहे. भात काढणीनंतर ते भाजीपाला व कलिंगड लागवड करीत असल्याने परिसरातील ग्रामस्थांना स्थानिक पालेभाज्या, कलिंगडे सहज उपलब्ध होत आहेत. त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून लागवडीसाठी प्रवृत्त केले आहे.डोंगराळ, कातळावरील पडीक जमिनीमध्ये शेतकऱ्यांच्या सहकार्याने आंबा, काजूची फळबाग त्यांनी फुलवली आहे. कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त लागवड तंत्राचा अवलंब करतानाच वेळोवेळी सफाई, खत व्यवस्थापन केले तर नक्कीच चांगले उत्पन्न फळबागायतीद्वारे मिळते, असा त्यांचा दावा असून, शेतकऱ्यांनाही याचे महत्त्व पटले आहे.
नाणीज, पाली परिसरातील शेतकऱ्यांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यामुळे येथील शेतकरी आता कांदा, बटाटा, हरभरा, तूर, गहू, ज्वारीसारखी पिके घेऊ लागले आहेत. आजकाल शेतीत मजुरांची समस्या भेडसावते. त्यासाठी शेतकऱ्यांचे गट स्थापन करून सहकारातून शेती केल्याने ती फायदेशीर ठरत आहे. अधिकाधिक क्षेत्र पिकाखाली येऊन शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत आहे.उन्नत शेती योजनेतून नाणीज येथील दहा हेक्टर क्षेत्रामध्ये ५० शेतकऱ्यांनी काजूची लागवड केली आहे. लागवडीचे तंत्र पटवून देत असतानाच किडींचा प्रादूर्भाव झाल्यास कोणती कीटकनाशके वापरावी, याबाबतही डवरी मार्गदर्शन करीत आहेत. चारसुत्री भातलागवड करण्याबरोबरच नाणीज येथे त्यांनी कीड सर्वेक्षण मोहिम सुरू केली असून, यासाठी तेथील दोन प्लॉटची निवड केली आहे.
या सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना भात पिकाचे कीडीपासून कसे संरक्षण करावे, याची माहिती देतानाच कीटकनाशके घरच्या घरी कशी तयार करावी, याचेही प्रात्यक्षिक दिले आहे.
सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देतानाच गांडूळ खत, कंपोस्ट खत शेतावर तयार करण्याबरोबर शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे येथील शेतकऱ्यांना वळविले आहे. शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच अधिक उत्पन्न देणारे वाण कसे निवडावे यासाठी डवरी त्यांना मदत करतात.शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहणे गरजेचे असून, त्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. स्वत: शेती करतानाच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना जमीन पडीक न ठेवता त्यामध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेण्यासाठी ते प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे या परिसरातील ग्रमास्थांचा शेतीकडे ओढा वाढला आहे.
कोकणातील मातीत कोणत्याही प्रकारची पिके घेता येतात. शिवाय उत्पन्नही चांगले येते, हे त्यांनी पटवून दिले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चंद्रकांत इरमल यांनी ज्वारी, कांदा, बटाटा, पावटा, हरभरा ही पिके घेऊन त्यातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे....तर नंदनवन फुलेल
कोकणात शेतकऱ्यांचे जागा पडीक टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याऐवजी पडीक जमिनीचा पोत पाहून फळबाग किंवा अन्य पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. यामुळे जागा लागवडीखाली येईल व शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नदेखील प्राप्त होईल. विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकरी पडीक जमिनीवर नंदनवन फुलवू शकतात.