रत्नागिरी : इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या बँकेची पोस्ट कार्यालयात एकूण ६६३ सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली. या बँकेची मुख्य शाखा रत्नागिरी प्रधान डाकघर येथे आहे. पोस्टातील पोस्टमन आता मोबाईलव्दारे ग्राहकांना घरपोच बँकींग सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती डाकघर अधिक्षक ए. बी. कोड्डा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी व्यवस्थापक बसंत बक्षला उपस्थित होते.
ग्राहकांना या बँकेचे खाते फक्त आधारकार्ड दाखवून तसेच शून्य रूपयांनी काढता येणार आहे. या बँकेच्या खातेदारांना घरबसल्या वीजबील, मोबाईल बील, मोबाईल रीचार्ज, फंड ट्रान्सफर यामध्ये एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस या सुविधांचा तसेच पोस्टातील सुकन्या, आरडी, पीपीएफ खात्यांमध्ये देखील पैसे भरता येणार आहेत. सर्वसामान्य व्यक्ती, तळागाळातील तसेच खेडोपाड्यातील ज्या व्यक्ती आजपर्यत बँकींग क्षेत्रापासून वंचित राहिल्या आहेत. त्या व्यक्तींपर्यत देखील ही बँक पोहोचणार आहे. आजपर्यत या बँकेची ४ हजार ५० खाती खोलण्यात आली आहेत. ग्राहकांकडून या बँकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असल्याचे कोड्डा यांनी सांगितले.