चिपळूण / आवाशी : लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीमध्ये गेले महिनाभर वीज व पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता आहे. गेले ३६ तास लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वालोपे येथील पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे तेथे दुरुस्तीचे काम सुरु आहे.वालोपे पंपहाऊसमधील फ्लो मीटरच्या प्लँजचे गॅसकीट लीक झाल्याने पाणीपुरवठा बंद झाला होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ देखभाल व दुरुस्तीबाबत गांभीर्याने पाहत नाही. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरवठा होत असलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची चर्चा होत आहे.
दोन दिवसांपूर्वी लोटे पंप हाऊसमधील सीटीबीटी खराब झाल्याने पाणीपुरवठा बंद होता. सीटी बीटी खराब होण्याची गेल्या सहा महिन्यातील ही तिसरी घटना आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला यासाठीचे साहित्य पुरवणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. गेले ३६ तास परिसराचा पाणी पुरवठा बंद आहे.
लोटे-परशुराममध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या असल्यामुळे त्यांना पाणी मोठ्या प्रमाणावर लागते. किंबहुना पाणी हाच त्यांचा कच्चा माल आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. प्रत्येक उद्योजकाने २४ तास पुरेल इतका पाणीसाठा केलेला असतो. परंतु, गेले महिनाभर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कारभाराबाबत उद्योजकांच्या मनात तीव्र संतापाची भावना आहे.नोव्हेंबर महिन्यामध्ये ३० तास, डिसेंबरमध्ये १२० तास व जानेवारी महिन्यात १२५ तास पाणीपुरवठा खंडित झाला होता. गेले महिनाभर दर २४ तासांनी ८ तास पाणीपुरवठा बंद असतो. वीजपुरवठाही वारंवार खंडित होण्याचे प्रकार फार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.
वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर पाण्याची पाईपलाईन फुटते, पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम झाल्यावर भरतीच्या काळात ४ तास पंपिंग करता येत नाही. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पुरेशी पाणी साठवणूक क्षमता नसल्यामुळे उद्योजकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीला ३० वर्षे झाली असून, वालोपे येथून होणारा पाणीपुरवठा हा ज्या पाईपलाईनमधून केला जातो ती जुनी झाल्यामुळे पाईपलाईन वारंवार फुटण्याच्या घटना घडत असतात. ही पाईपलाईन नव्याने टाकावी, अशी मागणी उद्योजक संघटनेने केली आहे.
मुख्यालयाकडून हा प्रस्ताव मंजूर करुन आणण्यात आला. परंतु, अद्यापही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हे काम पूर्ण केलेले नाही. महामंडळाकडून पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन योग्यरित्या केले जात नसल्याने पाणीपुरवठा अखंडितपणे होत नाही. याबाबत वारंवार उद्योजक संघटना प्रयत्न करीत आहे. मात्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी याबाबत उदासीन असल्यामुळे नियमित पाणीपुरवठा होत नाही.
उद्योजकांच्या समस्यांबाबत प्रशासनात असलेली उदासिनता, वारंवार खंडित होणारा वीज व पाणी पुरवठा यामुळे येथील उद्योजक हैराण झाले आहेत. परराज्यात वीज स्वस्त असल्यामुळे अनेक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत.
कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या उद्योजकांना कर्नाटक सरकारने चांगल्या सोयीसुविधा दिल्या आहेत व बरेचसे उद्योग कर्नाटकात नेले. गुजरात, मध्यप्रदेश याठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योग स्थलांतरित होण्याची प्रक्रिया सुरु आहे.एका बाजूला शासन मॅग्नेटिक महाराष्ट्रसारखे उपक्रम करत आहे. हे उपक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम होत असून, त्यातून खरंच किती उद्योग महाराष्ट्रात येतात, याबाबत सर्वांच्या मनात साशंकतेची भावना आहे.
सध्या महाराष्ट्रात असणाऱ्या उद्योजकांना माफक दरात वीजपुरवठा व पाणी पुरवठाही शासन करु शकत नाही तर नव्याने येणाऱ्या उद्योजकांना पाणी व वीजपुरवठा कशा पद्धतीने केला जाईल, याबाबत उद्योजकांमध्ये संभ्रमाची भावना आहे. शासनाने अत्यंत गांभीर्याने या विषयाकडे बघावे व उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे उद्योजक संघटना शांत बसली आहे. अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा उद्योजकांनी पवित्रा घेतला होता.जिल्हाधिकारी यांनी बोलावली बैठकउद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी सुरळीत पाणी व वीजपुरवठा होत नसल्याने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिनांक २७ मार्च रोजी उद्योजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व महाराष्ट्र विद्युत नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांची सभा रत्नागिरी येथे आयोजित केली आहे.