रत्नागिरी : संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र कोल्हापूरला हलविल्याबाबत लवकरच रत्नागिरी व कोल्हापूर येथील नाट्यकर्मींची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.शिक्षणाची वारी उपक्रमाच्या उद्घाटनासाठी विनोद तावडे आज रत्नागिरीत आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी संगीत राज्य नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
अंतिम फेरीत विजय संपादन करणाऱ्या संघाच्या जिल्ह्यात पुढील वर्षीचे प्राथमिक फेरीसाठी केंद्र नियोजित असते. यावर्षी रत्नागिरी नियोजित केंद्र असताना कोल्हापूर येथे केंद्र हलविण्यात आले आहे. या निर्णयामुळे नाट्यप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. हे केंद्र पुन्हा रत्नागिरीलाच मिळावे यासाठी रत्नागिरीतील नाट्यप्रेमींनी आंदोलनही केले.विनोद तावडे आज रत्नागिरीत आले असतात रत्नागिरीतील संगीतप्रेमींनी त्यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. याबाबत पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी रत्नागिरी व कोल्हापूर येथील नाट्यकर्मींची लवकरच बैठक आयोजित करून या प्रश्नावर तोडगा काढण्यात येणार आहे, असे सांगितले.
एकतर नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी किंवा नाट्यमहोत्सव रत्नागिरीत आयोजित करण्यात येईल. ज्यामध्ये अंतिम स्पर्धेत निवड झालेल्या उत्कृष्ट नाटकांचे सादरीकरण महोत्सवामध्ये करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.