रत्नागिरी : कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी उक्षी - बनाचीवाडी येथील संरक्षित कातळ खोद शिल्पाची पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी., अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब बेलदार, प्रांताधिकारी अमित शेडगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विश्वास सीद, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, उक्षीचे सरपंच मिलिंद खानविलकर, सुधीर रिसबूड, ऋतुराज आपटे उपस्थित होते.आयुक्त जगदीश पाटील यांनी मार्गदर्शन करताना पर्यटन क्षेत्रात प्रगती करण्यासाठी कोकणामध्ये भरपूर वाव आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना काही तरी वेगळं दिलं पाहिजे. उक्षी बनाचीवाडी येथे असलेल्या २० फूट लांब व १६ फूट रुंदीचे हत्तीचे शिल्प संरक्षित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील इतर कातळशिल्पांचे संरक्षण व संवर्धन करुन आपण रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना त्याचा लाभ देऊ शकतो.
तसेच अशा प्रकारचे कातळ शिल्पाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या उक्षी गावच्या ग्रामस्थांचे कोकण विभागीय आयुक्त पाटील यांनी कौतुक केले. यावेळी कातळ खोद शिल्पाचे अभ्यासक सुधीर रिसबुड आणि ऋतुराज आपटे यांनी जिल्ह्यामध्ये असलेल्या विविध कातळ शिल्पांबाबत कोकण विभागीय आयुक्त पाटील यांना माहिती दिली. सरपंच मिलिंद खानविलकर यांनी उक्षी येथील कातळ शिल्प संरक्षण व संवर्धनासाठी प्रशासनाकडून होत असलेल्या मदतीबाबत आभार मानले.