देवरूख : पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पाच्या आपत्कालीन सेवाद्वाराच्या दुरूस्ती कामासाठी धरण रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामाला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. धरणालगतच्या गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता गडनदी प्रकल्प अभियंता व संगमेश्वर तहसीलदार यांनी केले आहे.रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी ८ डिसेंबर २०१८ रोजी गडनदी धरण क्षेत्राची पाहणी केली. यावेळी धरणाची सद्यस्थिती जाणुन घेतली. यावेळी धरण दुरूस्ती करणे आवश्यक असल्याचे वायकर यांनी स्पष्ट करत आपत्कालीन सेवाद्वाराची दुरूस्ती करा, अशा सुचना दिल्या. याप्रमाणे गडनदी धरण प्रकल्पाच्या अधिकारी वर्गाने सर्व्हे केला. त्याप्रमाणे हे काम सुरू करण्यात येणार आहे. याकरिता सद्य स्थितीला धरणात असलेले पाणी सोडण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी धरण रिकामे करणेबाबत निर्देश दिले आहेत.या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय अभियंता गडनदी प्रकल्प उपविभाग कुचांबे सज्ज झाला आहे. धरणातील पाणी नदीद्वारे सोडून देवून धरण रिकामे करण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. याबाबतचे निर्देश लगतच्या मंडल अधिकारी, तलाठी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे नदीव्दारे धरणाचे पाणी सोडण्यात येणार असल्याच्या कालावधीत धरणालगतच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.संगमेश्वर तालक्यातील दहा गावे तसेच चिपळूण तालुक्यातील दहा गावे अशा २० गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील गावांमध्ये कुटगिरी, कळंबुशी, कासे, असावे, आरवली, कोंडिवरे, बुरंबाड, सरंद, मुरडव, कुंभारखाणी आदींचा समावेश आहे. संबंधित तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, मुख्याध्यापक यांना तहसीलदार संगमेश्वर यांनी आपल्या स्तरावरून आदेश निर्गमीत केले आहेत.