रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे भविष्यात या मार्गावरील अपघातांत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
भविष्यातील वाढते अपघात टाळायचे असतील तर या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. नुकत्याच कोकणात झालेल्या दौऱ्यात ही बाब वायकर यांच्या निदर्शनास आली आहे.मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प हा केंद्र शासनाकडून मंजूर असून, या मार्गाचे काम सध्या सुरू आहे. यासाठी आवश्यक जमीनही संपादित करण्यात आली आहे. त्यानंतर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमध्ये व शहरांतर्गत वाहतुकीत झालेली वाढ विचारात घेता, दळणवळणासाठी चांगले रस्ते जनतेला उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती डोंगराळ असून, जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे येथील रस्त्यांची लवकर दुरवस्था होत असल्याचे वायकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.वायकर यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यावेळी चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली असता, सध्या सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असून, केवळ मातीचे थरांवर क्राँक्रिटीकरण केले जात आहे. या रस्त्याचा पायाच मजबूत नसल्याने मुसळधार पावसात ही माती वाहून जाऊ शकते. तसेच माती रस्त्यावर आल्यास अपघाताचा धोका असून, या प्रकरणी तातडीने लक्ष देण्याची विनंती गडकरी यांना पालकमंत्री रवींद्र वायकर केली आहे.उच्चस्तर चौकशी हवीमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाची आपल्या स्तरावरुन चौकशी करण्यात यावी, अशी विनंती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केंद्र्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.