रत्नागिरी : सुरक्षित प्रवास आणि विश्वासार्हता ही एस. टी.ची बलस्थाने आहेत. एस. टी.ची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. काळाच्या ओघात एस. टी.चे रूपडे पालटत आहे. गेल्या ७० वर्षांच्या कालखंडात खूप बदल झाला असून, शिवशाही हे त्याचे द्योतक आहे. भविष्यात स्पर्धेच्या दृष्टीकोनातून एस. टी.ने आणखी दर्जेदार सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी विभागातर्फे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विभाग नियंत्रक अनिल मेहतर, यंत्रअभियंता (चालन) विजय दिवटे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, आगार व्यवस्थापक अजय मोरे उपस्थित होते. विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. यंत्रअभियंता (चालन) विजय दिवटे यांनी गेल्या ७० वर्षातील एस. टी. महामंडळाच्या कारकीर्दीचा आढावा घेतला.विभाग नियंत्रक अनिल मेहतर म्हणाले की, प्रवाशांच्या सहकार्यामुळे एस. टी.ने ७० वर्षांचा अविरत प्रवास साध्य केला आहे. यापुढील प्रवासही प्रवाशांच्या सहकार्यातूनच होणार आहे. प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. विभाग नियंत्रक मेहतर यांच्या हस्ते अभिजीत घोरपडे यांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले. आगार व्यवस्थापक अजय मोरे यांनी आभार मानले.स्थानकांचा कायापालटसुरूवातीच्या काळातील एसटी व आताची एसटी यामध्ये प्रचंड बदल झाला असून आधुनिक तंत्रज्ञानाचे अवलंबन करून लागल्याने एसटीबरोबर बसस्थानकांचेही कायापालट होत असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी एस्. टी. प्रशासनामार्फत प्रवाशांना पेढा व गुलाबपुष्प देवून शुभेच्छा दिल्या.