रत्नागिरी : कमी होणाऱ्या जंगलांमुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्यांनी मनुष्यवस्तीकडे वळण्यास सुरूवात केली आहे. भक्ष्याच्या शोधात आलेल्या आणि विहिरीत पडलेल्या बिबट्यांची संख्या आता वाढू लागली आहे.
शुक्रवारी रत्नागिरीनजीकच्या खेडशी गावामध्ये एक बिबट्या विहिरीत पडला. त्याला वन खात्याने पिंजऱ्यात पकडून सुरक्षित अधिवासात सोडला आहे.गुरूवारी मध्यरात्री खेडशी येथे एक बिबट्या रोहीत राजेंद्र विचारे यांच्या घरालगतच्या विहिरीत पडला. शुक्रवारी सकाळी ही बाब विचारे कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने त्याची माहिती वन खात्याला दिली.
वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला पकडले आणि त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले. हा बिबट्या नर जातीचा असून, साडेतीन वर्षांचा आहे.
राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, लांजाचे वनपाल पी. जी. पाटील, पालीचे वनपाल एल्. बी. गुरव, जयगडचे वनरक्षक परमेश्वर डोईफोडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केले.