रत्नागिरी : कोकण रेल्वेत मंगळवारी झालेल्या गोंधळात एस्. टी. महामंडळाचा फायदा झाला आहे. मंगळवारी रेल्वेचे प्रवासी एस्. टी.कडे वळल्याने जादा गाड्यांच्या वेळापत्रकापेक्षा तब्बल ६१ आणखी जादा गाड्या मुंबईकडे मार्गस्थ झाल्या.गौरी-गणपतींच्या विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी एस. टी.च्या ६६६ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्ये रत्नागिरीच्या प्रवाशांना पायही ठेवायला जागा नसल्याने अनेक प्रवाशांनी अखेर एस. टी.कडे मोर्चा वळवला. त्यामुळे मंगळवारी एका दिवसात एस. टी.च्या ७२७ गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या.गौरी - गणपतीसाठी मुंबई व उपनगरांतून २२२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. पैकी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २ हजार ६९ गाड्या आल्या होत्या. मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून सोमवारपासूनच जादा गाड्या सुरू झाल्या आहेत. एकूण १३६६ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, कोकण रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नसल्यामुळे प्रवासी अखेर एस. टी.कडे वळले असल्याने एस. टी.च्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.कोकण रेल्वेच्या गाड्या सिंधुदुर्गातूनच भरून येत असल्यामुळे पॅसेंजर गाड्यातही जागा मिळत नाही. आरक्षण असूनही बसायला जागा मिळत नसल्याचे रेल्वे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. रेल्वेच्या गर्दीत निभाव लागणार नसल्यामुळेच प्रवाशांनी एस. टी. प्रवासाला पसंती दर्शविली आहे.
मंगळवारी एस. टी.च्या ६६६ गाड्यांचे आरक्षण असतानाच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे महामंडळाने आणखी ६१ जादा गाड्या सोडल्या. बुधवारसाठी ४२७ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे ४५० गाड्या सोडण्यात आल्या.
प्रवाशांच्या मागणीनुसार एसटीने जादा गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रत्नागिरीविभागातील सर्व आगारातून जादा गाड्यांना मागणी वाढली. त्यामुळे एकाच दिवशी ६१ जादा गाड्या सोडण्यात आल्या. बुधवारी देखील २५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी एसटी प्रशासन जादा गाड्यांची उपलब्धता करून देणार आहे.- अनिल मेहतर, विभागनियंत्रक, रत्नागिरी