रत्नागिरी : हातीस येथील पीर बाबरशेख उरूसाच्या दुस-या दिवशी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गतवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील लाखो भाविकांनी पीर बाबरशेखांचे दर्शन घेतल्याचे हातीस ग्रामविकास मंडळाकडून सांगण्यात आले.
पहिल्या दिवशी रात्री चंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रथम हातीस व नंतर इब्राहीमपट्टण येथील बांधवांकडून बाबरशेखांच्या कबरीवर गलफ चढवण्यात आली. त्यानंतर भाविकांचे आकर्षण असणा-या शस्त्रांचा खेळ सुरू करण्यात आला. यावर्षी हा खेळ पाहण्यास भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बाबरशेखांवर श्रद्धा असणारे अनेक लोक या खेळांमध्ये जीवघेण्या शस्त्रांचा मारा करून घेतात. परंतु आजपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. यानंतर गाऱ्हाणी घालायला सुरुवात झाली. गुरुवारी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत भाविकांची गा-हाणी चालू असल्याचे पाहायला मिळत होते. गुरुवारी पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत होते. दुचाकी, चारचाकी, बसेस व पायी जाणा-या भाविकांमुळे रस्त्याला गर्दी पाहायला मिळत होती.
हरवलेली वस्तू अन् गवसलेली माणुसकी-
उरुसामध्ये आलेल्या लाखो भाविकांच्या हरवलेल्या काही अनमोल गोष्टी हातीस ग्रामविकास मंडळाच्या कार्यालयांमध्ये जमा केल्या जात होत्या. यामध्ये महागड्या मोबाईलपासून अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. पीर बाबांच्या उरुसामध्ये आल्यानंतर सापडलेली वस्तू कार्यालयामध्ये जमा करण्याचा सकारात्मक विचार भाविकांमध्ये पाहायला मिळत होता. ही बाबरशेखांची प्रेरणा असल्याचे परिसरामध्ये बोलले जात होते. महागडे मोबाईल मंडळाच्या कार्यालयात जमा करण्याची बाब निश्चितपणे कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.