रत्नागिरी : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता अॅप डाऊनलोड करणे, त्यावर तक्रारी नोंदविणे आणि नगर परिषदांच्या कामाबाबत स्माईलीद्वारे अभिप्राय देणे यावर नगर परिषदांचे गुणांकन अवलंबून राहणार आहे. यासाठी आता ३१ डिसेंबर २०१७ची डेडलाईन ठेवण्यात आली असून, यात नागरिकांचा अधिकाधिक सहभाग महत्त्वाचा आहे. या स्पर्धेत चिपळूण नगर परिषद पहिल्या श्रेणीत असून, रत्नागिरी नगर परिषद द्वितीय श्रेणीत आहे.शहरे स्वच्छ व्हावीत, या उद्देशाने केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू केले. आॅगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देशभर हे अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. हे अभियान ३१ डिसेंबरला संपणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छता अॅप तयार करण्यात आले आहे.
या अॅपद्वारे नागरिकांना त्यांच्या तक्रारी अगदी फोटोसह नोंदविण्याची संधी आहे. तसेच एखाद्या नगर परिषदेच्या कामाचे मूल्यांकन स्माईलीद्वारे करता येते. हे अॅप शहरातील नागरिकांपर्यंत नगर परिषदेच्या माध्यमातून पोहोचावे, त्याची माहिती नागरिकांना व्हावी, हा या अभियानामागचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी नगर परिषदांनी आॅडिओ, व्हिडिओ, बॅनर, स्वच्छतादूत यांच्या माध्यमातून प्रसिद्धी करावयाची आहे.पहिल्या टप्प्यात हागणदारीमुक्त शहर करण्याचे उद्दिष्ट होते. तर आता दुस टप्प्यात स्वच्छ शहर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील नागरिकांमध्ये याबाबत जागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वच्छता अॅप तयार करण्यात आले आहे.
आॅगस्ट ते डिसेंबरअखेर या स्पर्धेचा कालावधी ठरवण्यात आला आहे. यात रत्नागिरीसह चिपळूण, खेड आणि राजापूर नगर परिषद तसेच दापोली नगरपंचायतीचा समावेश आहे. ३१ डिसेंबरपर्यंत या नगर परिषदांच्या हद्दीतील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यावर तक्रारी नोंदविल्या तसेच अभिप्राय नोंदविला तर या नगर परिषदांचे गुणांकन वाढून त्यांची श्रेणी वाढणार आहे.
त्यानंतर ४ जानेवारीपासून केंद्राने नियुक्त केलेले पथक या शहरांची पाहणी करणार आहे. या सर्वेक्षणात अधिकाधीक नागरिकांचा सहभाग आहे का, त्यांना या सर्वेक्षणची माहिती आहे का, हे पाहण्यासाठी त्या शहरातील कुठल्याही नागरिकाला फोन करून याबाबत सहा प्रश्न विचारून माहिती घेतली जाणार आहे. यावर त्या नगर परिषदांची या स्पर्धेतील यशस्वीता अवलंबून राहणार आहे. केवळ दोनच दिवसात नागरिकांना हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आव्हान आहे.समिती कुठल्याही नागरिकाला फोन करणाररत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, राजापूर या पाच शहरांचा या स्पर्धेत सहभाग आहे. ३१ डिसेंबरला या स्पर्धेचा कार्यकाल संपत आहे. त्यानंतर या शहरांची पाहणी करण्यास येणारी समिती शहरातील कुठल्याही नागरिकाला फोन करून या अभियानाबाबत सहा प्रश्न विचारेल, त्यात पहिला प्रश्न या अभियानाबाबत माहिती आहे का? असा विचारला जाणार असून, उर्वरित पाच प्रश्न याच्याशी संबंधित असणार आहेत.
पहिला प्रश्न होकारार्थी असेल तर त्या नगरपंचायतीला १७५ गुण मिळणार आहेत. आत्तापर्यंतच्या सर्वेक्षणात गुणवत्तेनुसार क्रमांक देण्यात आले असून, त्यात चिपळूण शहर १७८ व्या क्रमांकावर, त्याखालोखाल रत्नागिरी १८४, राजापूर ३१४, दापोली ३९० आणि खेड ४३० व्या क्रमांकावर आहे.