रत्नागिरी : केवळ पुढाऱ्यांची शिफारस म्हणून कर्जवाटप केले गेले तर सहकार क्षेत्र कोणत्याही क्षणी धोक्यात येऊ शकते. ग्राहकाची विश्वासार्हता, त्यासाठीचे तारण आणि कर्ज घेण्यामागील कारण या त्रिसुत्रीचा विचार करूनच कर्जवाटप होणे गरजेचे आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी व्यक्त केले. अपघातात दगावलेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना दहा हजार रूपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झाली. देशातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. चोरगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, शामराव पानवलकर, सुधाकर सावंत, मधुकर टिळेकर यांनी डॉ. चोरगे यांचा सत्कार केला.राजकीय पक्षांंचे पुढारी कार्यकर्त्यांसाठी कर्ज मागणीचे प्रस्ताव पाठवतात. मात्र, वेळेवर परतफेड होत आहे की नाही, याकडे दुर्लक्ष करतात. ही प्रवृत्ती वाढत असल्याने बँका, पतसंस्था अडचणीत येत आहेत. यापुढे प्रत्येक पुढाºयाने कर्ज मागणीचा प्रस्ताव सादर करताना परतफेडीची हमी द्यावी, असा सल्ला डॉ. चोरगे यांनी दिला.बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर केलेली जीवन गांगण यांची नियुक्ती योग्यच असल्याचा निर्वाळा डॉ. चोरगे यांनी दिला. व्यवस्थापकीय संचालक पदावर गांगण यांची केलेली नियुक्ती सर्व सहमतीनेच आहे. कुणीही या नियुक्तीवर आक्षेप, हरकत घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.साखर कारखान्यांच्या कर्जपुरवठ्यासाठी समितीराज्याच्या काही जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी जिल्हा बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. या कारखान्याची आर्थिक क्षमता पाहण्यासाठी जिल्हा बँक उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात सात संचालकांचा समावेश आहे.
साखर कारखान्याचे अध्यक्ष, संचालक मंडळातील मान्यवर पुढारी नसल्यास त्यांना मागणीनुसार कर्जपुरवठा करण्याचे धोरण बँकेने स्वीकारले आहे, असे ते म्हणाले. अनेक पुढाऱ्यांनी जिल्हा बँकेला फसवले आहे. कर्ज वितरणातील चूक जिल्हा बँकेला कोणत्याही क्षणी महागात पडू शकते. त्यामुळेच ही समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती निपक्षपातीपणे आपले काम पार पाडेल, असा विश्वास डॉ. चोरगे यांनी व्यक्त केला.