राजापूर : नाणारमधील प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून रिफायनरीबाबतचा निर्णय घेऊ, असे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रकल्प परिसरात येऊन जनतेची भेट घ्यावी. प्रकल्पाबाबत असलेले जनमत लक्षात घेऊन तेथेच झटपट निर्णय घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना भेटून करणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी राजापुरात दिली.
जनतेची दिशाभूल करणाऱ्या रत्नागिरी रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल कंपनीशी कुठलीच चर्चा करणार नसल्याचे सांगताना संबंधीत कंपनीचे अधिकारी नाणार परिसरात जनतेला भेटण्यासाठी आले तर त्यांना पळवून लावू, असा इशाराही त्यांनी दिला.रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा सुरूवातीपासून कडाडून विरोध आहे. या प्रकल्पाविरोधात संघर्ष करणारे भाई सामंत यांच्या समवेत शिवसेना असून, आम्ही जनतेसमवेत असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. नाणार परिसरातील चौदा गावांचा या प्रकल्पाला विरोध असताना रत्नागिरी रिफायनरी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन रिफायनरीला फक्त चौदा टक्के जनतेचा विरोध असल्याचे विधान केले होते, त्याचा त्यांनी समाचार घेतला. वेळेप्रसंगी रत्नागिरीमधील कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चाही काढू, असा इशारा त्यांनी दिला.पत्रकार परिषदेला आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती दीपक नागले, सभापती सुभाष गुरव, शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष व कोकणचे संघटक दिनेश जैतापकर उपस्थित होते....तर गाशा गुंडाळावाजनता प्रकल्पाच्या बाजूने असल्याचे दिसून आले तर त्याच क्षणी भूमिपूजनाचा कार्यक्रम करून घ्या आणि स्थानिक जनतेचा विरोध असल्याचे दिसून आले तर प्रकल्पाचा गाशा गुंडाळावा, असे ते म्हणाले.प्रकल्पग्रस्तांसाठी बैठककोकण रेल्वेबाबत प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत त्यासाठी दिनांक १९ एप्रिलला रत्नागिरीत कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी गुप्ता यांच्याशी बैठक आयोजित केली आहे, अशी माहितीही दिली.