देवरूख : पत्रकार ,लेखक, साहित्यिक यांच्या लेखनीमध्ये मोठी ताकद आहे. आज पत्रकार दिनदेखील आहे. ग्रंथालयाचे सुशिक्षित असंख्य कर्मचारी मजुरांना मिळणाऱ्या वेतनापेक्षा तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. २०१२ पासुन शासकीय अनुदानात वाढ झालेली नाही. यासारख्या अनेक समस्या ग्रंथालय विभागाला भेडसावत आहेत. हा विभाग अनंत अडचणींनी होरपळत असल्याची खंत कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेंद्र वैती यांनी व्यक्त केली.कोकण विभाग ग्रंथालयाचे २१वे वार्षिक अधिवेशन व जिल्हा ग्रंथालयाचे ४३वे वार्षिक अधिवेशन देवरूख येथे रविवारी श्री लक्ष्मी नृसिंग मंगल कार्यालयात संपन्न झाले. शहरातील श्री सदगुरू लोकमान्य वाचनालयाच्या पुढाकाराने हे अधिवेशन कै. राजा राजवाडे साहित्यीक नगरीत घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून वैती बोलत होते. ते पुढे म्हणाले की, परखड लिखाणाच्या माध्यमातूनच ही चळवळ बुलंद होवू शकते. त्यातून ग्रंथालय सेवकांच्या समस्या मार्गी लागू शकतात. तसेच या अधिवेशनामध्ये आपण शासनाच्या विरोधात आंदोलनाची भूमिका स्वीकारत असल्याचे अखेर वैती यांनी सांगितले.उद्घाटनापूर्वी श्री सदगुरू लोकमान्य वाचनालयाच्या सभागृहात ग्रंथपुजन झाले. देवरूख न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेश परिधान करून पालखी नाचवली. यावेळी निवृत्त शासकीय अधिकारी अनंत साने, मुंबई विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक शालीनी इंगोले, आमदार सदानंद चव्हाण, देवरूखच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, उपसभापती अजित गवाणकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी वि. कुं . जगताप, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य नरेंद्र्र तेंडोलकर, साठ्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य माधव राजवाडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मुरलीधर बोरसुतकर, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष रविंद्र्र कालेकर, प्रमुख कार्यवाह श्रीकृष्ण साबणे, कोषाध्यक्ष गजानन कालेकर, उपाध्यक्ष विजय चव्हाण, सहसचिव संभाजी सावंत, तालुकाध्यक्ष जी. के. जोशी, कार्यवाह राजेंद्र राजवाडे, हिशोब तपासनीस धनंजय दळवी आदी उपस्थित होते.यावेळी आमदार चव्हाण म्हणाले की, अशी अधिवेशने सर्वांसाठी उपयुक्त व प्रेरणादायी ठरतील असे नमूद केले. बोरसुतकर म्हणाले की, ग्रंथालय कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे नमूद करत समाजाने ग्रंथालय चळवळीस पाठींबा द्यावा असे सांगितले.
डॉ. माधव राजवाडे म्हणाले वाचनालये ही जगण्याचे प्रेरणा स्त्रोत आहेत. ती कुटुंबाच्या केंद्रस्थानी देखील आहेत. देवरूख वाचनालयाने शतक महोत्सवी वर्ष पूर्ण करून वाचनालयाची परंपरा जपली आहे याचा आपल्याला विशेष अभिमान असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.शालिनी हिंगोळे म्हणाल्या की, मुलभुत गरजांप्रमाणे वाचनालय व साहित्य संपदा ही माणसाची आवश्यक गरज बनली पाहिजे. त्यासाठी शासनासह ग्रंथालय चळवळीतील सर्व दुवे सक्रीय राहतील असा विश्वास व्यक्त केला व अधिवेशनात कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण करून उत्तम मार्गदर्शन केले.
कोकण विभागीय ग्रंथालक संघाच्या अधिवेशनाचा उद्घाटन समारंभ सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला तर दुसऱ्या सत्रामध्ये बदलापुर येथील ग्रंथालय चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्यामसुंदर जोशी व गोवा येथील मराठी भाषेचे अध्यापक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांची उदबोधनपर व्याख्याने संपन्न झाली.
यानंतर तिसऱ्या टप्यात ग्रंथालक अनुदान, कर्मचारी सेवा शर्ती, वेतन श्रेणी इत्यादी विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. या कोकण विभागीय अधिवेशनामध्ये शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या अनुपस्थिती दिसून आली.