गुहागर : पहाटेच्या प्रहरी समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नरवण शाखा व्यवस्थापक प्रसाद कचरेकर यांना २५-३० किलो वजनाची तीन मोठी कासवे मच्छीमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉनच्या जाळयात अडकल्याचे दिसून आले.
त्यानंतर त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना त्याठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर कात्रीच्या सहाय्याने जाळे कापून तीनही कासवांची जाळ्यातून सुटका करण्यात आली. त्यापैकी २ कासवांना समुद्रात सोडण्यात आले तर एका कासवाला उपचारांसाठी वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.गुहागर समुद्रकिनारी अनेक नागरिक पहाटेच्यावेळी चालण्यासाठी येतात. गुहागर-वरचापाठ येथील प्रसाद कचरेकर हे चालण्यासाठी किनाऱ्यावर गेले असता, त्यांना किनाऱ्यावरील वाळूमध्ये तीन मोठी कासवे मच्छीमारी जाळ्यामध्ये अडकल्याचे दिसून आले. त्यांनी जवळ जावून पाहीले असता, जाळे कापल्याशिवाय त्यांची सोडवणूक करणे शक्य नसल्याने त्यांनी कासवमित्र चिन्मय कचरेकर यांना बोलावले.
यावेळी चिन्मया यांच्याबरोबर अल्केश भोसले, अमोल नरवणकर, दीप कचरेकर, सुभाष मोरे हे तरूणही त्याठिकाणी आले. सर्वांनी २०-२५ मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर कासवांना सुरक्षितपणे जाळ्यामधून बाहेर काढले. यातील दोन कासवांना समुद्रात सोडून दिले तर एका कासवाच्या पायाला नायलॉनची दोरी लागल्याने जखम झाली होती.
त्यामुळे त्याला अधिक उपचारांसाठी वनपाल आर. पी. बंबर्गेकर यांच्याकडे सोपविण्यात आले. बंबर्गेकर यांनी घटनास्थळी दाखल होत जखमी अवस्थेतील कासवाची पाहणी करून त्याला पुढील उपचारासाठी चिपळूण येथे नेले.दरम्यान, दिवसेंदिवस समुद्री जाळ्यांमुळे कासवांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. समुद्रात ठिकठिकाणी लावलेल्या मच्छीमारी जाळ्यांमध्ये कासवे अडकून एकतर जायबंदी तरी होतात अथवा मृत्यूमुखी तरी पडतात.