रत्नागिरी, दि. 20 - सलग तीन दिवस कोसळणारा पाऊस आणि वादळसदृश वाऱ्यामुळे खवळलेला समुद्र यामुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत मंगळवारी पाच नौका बुडाल्या. मात्र याचवेळी भरकटलेल्या तीन खलाशांची एक नौका ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वाचवण्यात आली आहे. उसळत्या लाटांवर डोलणारी ही नौका कधीही बुडण्याची भीती होती. पण किनाऱ्यावर जमलेल्या ग्रामस्थांनी ती वाचवली. त्यावर तीन खलाशी होते.
दरम्यान, रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात झालेल्या वादळी पावसाचा जोरदार तडाखा हर्णे येथील मच्छीमारांना बसला आहे. दापोली किनाऱ्याच्या विविध बंदरात नांगरून ठेवलेल्या पाच मच्छिमारी नौका या वाऱ्याच्या तडाख्याने उलटल्या. यामधील 21 हून अधिक जणांना वाचवण्यात यश आलं असून एका खलाशाचा मृतदेह हाती लागला आहे. त्यातील एक बोट समुद्रात हेलकावे खात असताना ती कॅमेऱ्यात कैद झाली. या बोटीत काही मच्छिमार होते. पण बोट जोरदार हेलकावे खात असल्यानं या बोटीवरील सर्वच मच्छिमारांनी थेट समुद्रात उड्या मारल्या. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
यातील बहुतांश खलाशांनी पोहत बाहेर येत आपले प्राण वाचवले. हर्णे येथील रामचंद्र जोमा पाटील यांची भक्ती, हरीश्चंद्र पाटील यांची गगनगीरी तर भारत पेडणेकर व संतोष पावसे यांच्या बोटी लाटांच्या तडाख्याने उलटल्या. यामुळे बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.केवळ दैव बलवत्तर म्हणून 20 हून अधिक जणांचे प्राण वाचले आहेत. रामचंद्र पाटील यांच्या बोटीवरील सात खलाशांपैकी पाच खलाशांना वाचवण्यात यश आले असून एक खलाशी अजूनही बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरु आहे. तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे. दरम्यान एनडीआरएफची एक टीम पुण्याहून दापोलीकडे रवाना करण्यात आली आहे.