रत्नागिरी : साहसी उपक्रमांबरोबरच समाजोपयोगी उपक्रमात सातत्याने सहभाग असलेल्या येथील जिद्दी माऊंटेनिअरिंगतर्फे रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली नैसर्गिक गुहा पर्यटकांसाठी खुली केली आहे. महाराष्ट्रातील ही पहिली नैसर्गिक गुहा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पहिल्याच दिवशी ३ ते ८५ वयोगटातील पर्यटकांनी या गुहेत जाण्याचा रोमांचकारी अनुभव घेतला.गेल्या वर्षी नगरपरिषदेचा पर्यटन महोत्सव झाला. यावेळी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रत्नदुर्ग किल्ल्यावर असलेली गुहा काही कालावधीनंतर पर्यटकांना पाहण्यास खुली होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार याची जबाबदारी जिद्दी माऊंटेनिअरिंग यांच्याकडे दिली होती. त्यानुसार आता ही गुहा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे.
या गुहेतील आतील भाग अद्भूत असाच आहे. गुहेत असलेल्या २३५ फूट लांबीचा पाण्यातील प्रवास करण्यासाठी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना लाईफ जॅकेटचीही सोय उपलब्ध आहे. आतील दोन निमुळत्या शिळांमधून प्रवास करणे, पर्यटकांसाठी आगळावेगळा अनुभव ठरतो. मंगळवारी पहिल्याच दिवशी ३ ते ८५ वयोगटातील पर्यटकांनी या गुहेत जाण्याचा रोमांचकारी अनुभव घेतला.असे आहे गुहेचे अंतरंगही गुहा ४०० फुटापर्यंत खोल आहे. गुहेत प्रवेश करताना सुरूवातीला ३ हात उतरावे लागते. त्यानंतर खऱ्या अर्थाने गुहेत जाण्याची वाट सुरू होते. १० फूट चालत गेल्यानंतर त्यापुढे ५ फूट सरपटत जावे लागते. पुन्हा ८ ते १० फूट चालत जावे लागते. त्यानंतर पुढे त्रिकोणी आकाराची शिळा चढून जावे लागते. पुन्हा १० ते १२ फूट उतरावे लागते. त्यासाठी शिडीची सोय आहे. पाण्यात उतरल्यानंतर २३५ फूट पाण्याचा प्रवास करावा लागतो.सुरक्षिततेची काळजीया गुहेतील २३५ फूट लांब आणि ४० इतकी खोली असलेल्या या पाण्यातील प्रवास करताना पर्यटकांच्या सुरक्षिततेला जिद्दी माऊंटेनिअरिंग संस्थेने प्राधान्य दिले आहे. हा प्रवास करताना प्रत्येक पर्यटकाला लाईफ जॅकेट पुरविले जाते. पर्यटकांसोबत या संस्थेचे दोन इन्स्ट्रक्टर दिले जातात. त्यांचे प्रशिक्षण जम्मू - काश्मीर तसेच राजस्थान येथे झालेले आहे.