रत्नागिरी : जिल्हा रूग्णालयाच्या नव्याने बांधल्या जाणा-या तसेच नूतनीकरण होणा-या इमारतीमध्ये अनेक त्रुटी दिसल्याने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी बांधकाम खात्याच्या अधिका-यांना चांगलेच सुनावले. बांधकामातील अनेक त्रुटींची पूर्तता करण्याचे आणि खराब काम करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही त्यांनी दिले.
शासकीय रुग्णालय येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नव्याने बांधण्यात आलेल्या इमारती तसेच नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतींची पाहणी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी शनिवारी केली. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता जे. एच. धोत्रेकर व इतर अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या.
शासकीय इमारती बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, या विभागामार्फत बांधण्यात आलेल्या इमारती दर्जेदार स्वरुपाच्या असल्या पाहिजेत. जेव्हा या इमारतीचे लोकार्पण होईल त्यावेळी या इमारती रुग्णांसाठी असुविधेचे कारण ठरता कामा नयेत, अशा शब्दात बांधकाम विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी खडे बोल सुनावले. जे कंत्राटदार कामामध्ये त्रुटी करतील, त्यांना काळ्या यादीमध्ये टाकावे तसेच दंडात्मक कारवाईदेखील करावी, असे आदेश देताना शासनाच्या निधीचा योग्य उपयोग करण्यासाठी चांगले काम करणाऱ्या कंत्राटदारांची निवड करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
रूग्णांच्या सुविधेसाठी जिल्हा रुग्णालयातील सर्व वॉर्डमध्ये गिझर बसवावेत तसेच स्वच्छतालयात स्वच्छतेसोबत मुबलक पाणी उपलब्ध करुन द्यावे, भंगारात निघालेल्या साहित्याची विल्हेवाट लावून वॉर्ड प्रशस्त करावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.यावेळी शल्यचिकित्सक प्रल्हाद देवकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे उपस्थित होते.