रत्नागिरी : तालुक्यातील मिऱ्या गाव तसेच रत्नागिरी शहराचा सागरी भाग व परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका आहे. मिऱ्या गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या २५४ मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे पडली आहेत.सन २०१६मध्ये या बंधाऱ्याच्या दुरस्ती कामासाठी ४९ लाख निधी मंजूर झाला. मात्र, यंदाही पावसाळ्याच्या पुरेसे आधी हे दुरुस्ती काम करण्यात आलेले नाही. दोन दिवसात जोरदार पाऊस सुरू असताना सोमवारी या दुरुस्ती कामाचा नारळ वाढविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत मिऱ्या येथील मच्छीमार नेते आप्पा वांदरकर लोकमतशी बोलताना म्हणाले, सन २०१६मध्ये मिऱ्या बंधारा दुरुस्तीसाठी व या बंधाऱ्याची उंची पावणेतीन फुटाने वाढविण्यासाठी ४९ लाख रूपये शासनाने मंजूर केले होते. परंतु गेल्या दोन वर्षात या बंधाऱ्याची दुरुस्ती काही झालेली नाही.
१३ मे २०१८ रोजी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, नव्याने दगड न आणता बंधाऱ्याचे समुद्राच्या पाण्यात कोसळलेले दगड जमा करून त्याद्वारे बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा प्रयत्न सुरू होता. जुने दगड वापरून उंची वाढविण्याचे कंत्राट आहे का, अशी विचारणा करीत स्थानिकांनी या मलमपट्टीला विरोध केला.
नवीन दगड आणून बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी केल्याचे वांदरकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सोमवारी (४ जून २०१८) पतन विभागाच्यावतीने या दुरुस्ती कामाचा आरंभ भाटीमिऱ्या येथे करण्यात आला. पाऊस सुरू झाल्यावर हे काम होणार कसे, दगड आणणार कुठून, असा सवालही वांदरकर यांनी केला.गेल्या अनेक वर्षांपासून मिऱ्या गावातील सागरी भागाला पावसाळ्यात सागरी लाटांच्या तडाख्याला सामोरे जावे लागते आहे. दगडी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. मिरकरवाडा व भगवती बंदरात उभारण्यात आलेल्या ब्रेक वॉटर वॉलमुळे जमिनीची धूप होण्याची ही समस्या निर्माण झाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.दहा ठिकाणी भगदाडेमिऱ्या येथील सागरी धूप बंधाऱ्याला सुमारे दहा ठिकाणी भगदाडे पडली आहेत. या बंधाऱ्याची उंची वाढविण्यासह दुरुस्तीचे ४९ लाखांचे काम खेडमधील कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र, त्यानंतर उपठेकेदाराकडे हे काम सोपविण्यात आले आहे. यातील प्रत्यक्षात काहीही काम झालेले नाही. त्यामुळे मिऱ्यामध्ये पावसाळ्यात सागराचे पाणी घुसण्याचा धोका कायम आहे.अतिक्रमणाचा मोठा धोकामिऱ्या गावातील बंधाऱ्याला वाडकर, भाटकर, जोशी, वांदरकर यांच्या घराच्या पाठीमागील भागात भगदाडे पडली आहेत. तालुक्यातील काळबादेवी गाव, रत्नागिरी शहरातील मांडवी, मुरुगवाडा व अन्य भागांनाही पावसाळी सागरी लाटांचा, अतिक्रमणाचा मोठा धोका आहे. याबाबत शासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.