आरवली : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी रात्री ९.३० वाजता विंचूदंशाचा रुग्ण आणला असता, त्याठिकाणी डॉक्टर किंवा कर्मचारी कोणीही उपस्थित नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी चक्क या आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकत निषेध नोंदवला. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर वैद्यकिय अधिकारी कदम यांनी विनंती केल्यानंतर अखेर रात्री उशीरा टाळे खोलण्यात आले.बुधवारी रात्री तुरळ चोबारवाडी येथील विंचूदंशाचा रुग्ण कृ ष्णा पाचकले यांना येथे आणले असता केंद्राच्या दरवाजाला कडी आढळून आली. ग्रामस्थांनी ही बाब मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या कानावर घातली. चव्हाण यांनी प्रत्यक्ष पहाणी केली असता तेथे डॉक्टर किंवा कर्मचारी कोणीच नसल्याचे दिसले. त्यानंतर चव्हाण यांनी संबंधित रुग्णाला खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी हलविले आणि तासभर वाट पाहिली. मात्र कोणीही दिसून न आल्याने अखेर त्यांंनी आरोग्य केंद्राला टाळे ठोकून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला.
तासाभराने कदम यांनी जितेंद्र चव्हाण यांना टाळे काढण्याची विनंती केली. त्यानंतर रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर रात्री उशीरा चव्हाण यांनी टाळे काढण्याचा निर्णय घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये यांनी यावर समक्ष भेट देऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण टाळे काढण्याचा निर्णय घेत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केंद्रावर लाखो रुपये खर्च होऊनही शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात जावे लागत असल्याने मृतांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत आहे. आरोग्य केंद्र परिसरात वाढलेले गवताचे जंगल मात्र तसेच असल्याने या परिसरात फिरणे धोकादायक बनले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या दोन डॉक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे पूर्वी एकच डॉक्टर असताना रुग्णाच्या होणाऱ्या तक्रारी आता कमी होणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता या तक्रारी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहेत. याबाबत तक्रार केली असता आपली नियुक्ती रद्द करुन घेण्याच्या धमक्या देत असल्याने ग्रामस्थ तक्रार करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे.