देवरूख : शहरातील शिवाजी चौक ते बसस्थानक या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मनसेच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. हे आंदोलन परवानगी न घेता केल्यामुळे देवरूख पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले. या आंदोलनाची दखल देवरुख नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी घेत येत्या १५ दिवसांत हे खड्डे भरण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मनसेने आपले आंदोलन स्थगित केले.मनसेने शहरात पडलेले खड्डे भरण्याची मागणी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच दोन दिवसात खड्डे न भरल्यास त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारादेखील दिला होता.
मात्र, प्रशासनाने याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे अखेर मनसे कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी चौक ते बसस्थानक या मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले. त्यामुळे या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरू होती.यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये नारळ, पेरू, आंबा, चांदाडी या वृक्षांचे रोपण करण्यात आले. दरम्यान, नगरपंचायतीचे कर्मचारी मार्ग मोकळा करण्यासाठी दाखल झाले असता, त्यांना मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केला. पोलिसांनीदेखील हे वृक्ष हटवण्याची विनंती केली.
मुख्याधिकारीच या खड्ड्यांना जबाबदार आहेत, त्यांनी प्रत्यक्ष याठिकाणी येऊन खड्डे भरण्याचे आश्वासन द्यावे त्यानंतरच हा मार्ग मोकळा केला जाईल, अशी भूमिका कोचिरकर यांनी घेतली. त्यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पोलीस स्थानकात आणून याठिकाणी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढावा, असे सूचित केले. याठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमुळे होणाºया अपघातांची माहिती लोंढे यांना दिली.मनसेने केलेले आंदोलन तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश असतानाही केल्याने मनसे कार्यकर्त्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये मनसे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, सागर संसारे, ऋतुराज देवरुखकर, सनी प्रसादे, सिद्भेश संजय वेल्हाळ या पाचजणांचा समावेश आहे.