रत्नागिरी : दादर - रत्नागिरी - दादर पॅसेंजर रेल्वे चालू करण्यासाठी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही भूमिकेत असून, या मागणीचे निवेदन शनिवारी कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना देण्यात आले.
हे निवेदन मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, तालुका अध्यक्ष महेंद्र नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहरअध्यक्ष अमोल अर्जुन श्रीनाथ यांच्यामार्फत देण्यात आले. या वेळी मनसेचे नाचणे उपविभागअध्यक्ष तथा कुवारबाव ग्रामपंचायत सदस्य गणेश मांडवकर, म.न.वि.से.चे उपतालुका अध्यक्ष अलंकार भोई, राजेश नंदाने, आशिष साळवी तसेच महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी - दादर पॅसेजर ही रेल्वे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. या रेल्वेचा मार्ग दादर ते रत्नागिरी व रत्नागिरी ते दादर असा होता. परंतु गाडीचा मार्ग बदलून ती गाडी थेट मडगावपर्यंत करण्यात आली. ज्यामुळे कोकणी माणसाची, रत्नागिरीकरांची एकमेव हक्काची गाडीही राहिली नाही. यामुळे प्रथम ही गाडी पहिल्यासारखी दादर-रत्नागिरी-दादर अशी चालू करावी, अशी मागणी यात केली आहे.
मार्च २०२०पासून दादर-रत्नागिरी पॅसेंजर (५०१०३) गाडी बंद आहे. सध्या गणपती सण जवळ येत असून, यासाठी बरेच चाकरमानी कोकणात येत असतात. अन्य गाड्यांमध्ये आरक्षण पटकन मिळत नाही. मिळाले तरी त्यांची तिकिटे सामान्य कोकणी माणसांना परवडणारी नाहीत. सध्या गुजरात, दिल्ली, राजस्थान, केरळ, तमिळनाडू, बंगळुरू आदी राज्यांतील गाड्या चालू आहेत. मग, आमची कोकणातील गाडी बंद का, असा प्रश्नही या निवेदनात करण्यात आला आहे.
रत्नागिरी - दादर पॅसेंजर बंद झाल्याने या गाडीवर उदरनिर्वाह व उपजीविका करणारे अधिकृत मराठी फेरीवाले यांची उपासमार होत आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण अडचणीत आले आहे. त्यामुळे ही गाडी चालू झाल्यास त्यांची उपासमार दूर होईल. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे जनरल डबे कोरोनामुळे आरक्षित केले जातात, त्याप्रमाणे या गाडीचेही जनरल डबे आरक्षित करावेत.
कोकणवासीयांच्या या मागणीचा विचार करून ही गाडी मूळ स्थितीत दादर-रत्नागिरी-दादर अशी पुन्हा चालू करावी. चालू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.