- संदीप बांद्रे चिपळूण - गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकरण उघडकीस आणून सोशल मीडियावर झळकणाऱ्या राधा लवेकर हिच्यावर शुक्रवारी येथील पोलीस स्थानकात सावकारी व जातिवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शहरात सावकारी विषयी जोरदार चर्चा सुरू असतानाच याप्रकरणी लवेकर हिच्यावर गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
येथील एका राजकीय पक्षाच्या महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी राधा लवेकर हिच्यावर सोपवण्यात आली होती. या पदावर कार्यरत असताना शहरातील एका बेकरी व्यावसायिकावर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्या पाठोपाठ अन्य काही प्रकरण हाताळून तिने सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या सर्व प्रकारानंतर तिच्या कार्यपद्धतीबद्दल कौतुक होण्याऐवजी पक्षांतर्गत नाराजी वाढली. अखेर या सर्व प्रकारानंतर तिने स्वतःहून पक्ष सोडला. मात्र त्यानंतरही राधा लवेकर सोशल मीडियावर विविध प्रकरण हातावर होती. त्यामुळे तिच्याविषयी शहरात तितकीच चर्चा सुरू होती. अशातच तिच्यावर सावकारी व एका महिलेविषयी जातिवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील बहादुरशेखनाका येथील महिलेने तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी लवेकर हिच्याकडून २८ ऑगस्ट २०२३ रोजी सावकारीतून २० हजार रुपये घेतले होते. व्याजी घेतलेले कर्ज फेडल्यानंतर तारण म्हणून ठेवलेली कागदपत्रे मागण्यासाठी गेलेल्या संबंधित महिलेला लवेकर हिने तिच्याशी वाद घातला. तसेच तिला जातीवाचक वक्तव्य केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार लवेकर हिच्या विरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २९१४ चे कलम ३९ आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम ३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने हे करीत आहेत.