रत्नागिरी : गौरी-गणपतीच्या सणाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून, गणेशोत्सवासाठीकोकणात राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे २ हजार २२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ८ सप्टेंबरपासून १२ सप्टेंबरपर्यंत या जादा गाड्या येणार असून, सर्वात जास्त १ हजार ५७९ गाड्या मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी सोडण्यात येणार आहेत.गणेशोत्सवाकरिता जादा २ हजार २२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी विभागातर्फे दररोजच्या ८० गाड्या सोडण्यात येणार आहेत. भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी १ हजार ५०० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सज्ज झाले असून, रत्नागिरी विभागातर्फे ठिकठिकाणी प्रवासी स्वागताचे शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. कोकण रेल्वे, खासगी गाड्यांमधून प्रवासी मोठ्या संख्येने येत असले तरी दरवर्षी एस. टी. महामंडळातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येते.
गेल्यावर्षी २ हजार २१६ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात २ हजार ७२ गाड्या कोकणात आल्या. यावर्षी गणेश चतुर्थी १३ सप्टेंबरला असल्यामुळे ८ पासून जादा गाड्या मुंबई, ठाणे, पालघर येथून दाखल होणार आहेत. दिनांक ८ सप्टेंबर रोजी १३, ९ रोजी ७५, १० रोजी ३५५, ११ रोजी १ हजार ५७९ आणि१२ला २०४ जादा गाड्या कोकणात येणार आहेत.ग्रुप बुकिंगला सर्वाधिक प्रतिसादमुंबईतून ग्रुप बुकिंगच्या ८९०, आरक्षणाच्या २३५ मिळून एकूण १ हजार १२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणेतून ग्रुप बुकिंगच्या ५२७, तर आरक्षणाच्या ३५१ मिळून ८७८, पालघर येथून ग्रुपच्या १६६ व आरक्षणाच्या ५६ मिळून २२२ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
एकूण गु्रप बुकिंगच्या १ हजार ५८३ व आरक्षणाच्या ६४२ जादा गाड्यांचे नियोजन महामंडळाने केले आहे. मुंबईतून ४००, पुण्यातून ४२५, औरंगाबादमधून ४५० व नाशिकातून ४७५ बसेस मिळून एकूण १ हजार ७५० जादा बसेस घेण्यात येणार आहेत.गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रत्नागिरी विभागातर्फे जादा गाड्यांसमवेत तपासणी नाके, गस्तीपथके तैनात करण्यात येणार आहेत. ही गस्तीपथके कशेडी ते संगमेश्वर व संगमेश्वर ते राजापूरपर्यंत कार्यरत राहणार आहेत. चिपळूण - शिवाजीनगर व संगमेश्वर बसस्थानक येथे तपासणी केंद्र उभारले जाणार आहे. संगमेश्वर येथे दुरूस्ती केंद्र, तर चिपळूण - शिवाजीनगर येथे क्रेन उपलब्ध करून दिली जाणार आहे.
गणेशोत्सव कालावधीत कोकण रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या सर्व गाड्या रेल्वे स्थानकमार्गे वळविण्यात येणार आहेत. चिपळूण, खेड, संगमेश्वर रेल्वेस्थानकांसाठी स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास रत्नागिरीतील शहरी मार्गावरील गाड्यांच्या संख्येतही वाढ केली जाणार आहे. रत्नागिरी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.- अनिल मेहतर,विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग
गस्तीपथके तैनातठाणे विभागाचे दुरूस्तीपथक इंदापूर येथे, रायगडचे पथक कशेडी येथे, तर रत्नागिरीचे पथक संगमेश्वर व सिंधुदुर्गचे पथक तरळा येथे दिनांक ८ रोजीपासून कार्यरत राहणार आहे. याशिवाय पेण, नागोठणे, माणगाव, महाड, खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली या एस. टी. कार्यशाळा आजपासून २४ तास कार्यरत राहणार आहेत. रायगड व रत्नागिरी विभागाची गस्तीपथके महामार्गावर ८ ते १३ सप्टेंबरपर्यंत २४ तास कार्यरत राहणार आहेत.