रत्नागिरी : वीजबिल वसुलीत बराच काळ अव्वल असलेल्या कोकण परिमंडलातही आता थकबाकीचे प्रमाण वाढू लागले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता सुमारे दीड लाख ग्राहकांकडे महावितरणची ३३ कोटी २२ लाख ८७ हजार रूपयांची थकबाकी आहे. यात सर्वात जास्त थकबाकी घरगुती ग्राहकांची असून, सार्वजनिक ठिकाणी पथदीपांचा प्रकाश उपलब्ध करणाऱ्या महावितरणच्या तिजोरीत मात्र अंधार पसरू लागला आहे.वीजबिल भरण्यात कोकण परिमंडल बराच काळ अव्वल स्थानी आहे. त्यामुळेच अनेक वर्षे भारनियमनातून कोकणाला दिलासा मिळत होता. मात्र, आता कोकणातही थकबाकी वाढू लागली आहे. सर्व क्षेत्रातील वीज ग्राहक मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. त्यात सर्वात मोठा वाटा घरगुती वीज ग्राहकांचा आहे. जवळपास ३८ टक्के थकबाकी घरगुती ग्राहकांकडेच आहे.कोकण परिमंडलांतर्गत रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १ लाख ४३ हजार ७४२ ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे महावितरणची ३३ कोटी २२ लाख ८७ हजार रूपयांची थकबाकी शिल्लक आहे. सर्वात जास्त थकबाकी घरगुती ग्राहकांची आहे. १ लाख ९ हजार ३९३ ग्राहकांकडे १२ कोटी ७४ लाख ७४ हजार १०३ रूपयांची थकबाकी आहे.सार्वजनिक पथदिव्यांसाठी वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणचे २ हजार ७६६ स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आठ कोटी २ लाख ६१ हजार ५०४ रूपये थकीत आहेत. वाणिज्यिक विभागातील १४ हजार ५२९ ग्र्राहकांकडील सहा कोटी २५ लाख ८७ हजार ७८४ रूपये वसूल करावे लागणार आहेत. औद्योगिकच्या २७८० ग्राहकांकडे २ कोटी ४५ लाख ३५ हजार ४७० रूपये थकीत आहेत.
सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या २०५८ ग्राहकांकडे २ कोटी ३ लाख ८७ हजार ६४५ कृषिपंपाच्या ९ हजार ४१४ ग्राहकांकडे ८३ लाख ९६ हजार २०५ रूपये थकीत आहेत. घरगुती, पथदीप व अन्य मिळून सर्व प्रकारच्या ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरणने मोहीम सुरू केली असून, वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.आर्थिक वर्ष समाप्तीमुळे महावितरणने मार्च महिन्यात जोरदार वसुली मोहीम राबविली होती. फेब्रुवारीअखेर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९ हजार १६६ ग्राहकांकडे ४ कोटी ७६ लाख २२ हजार रूपये थकबाकी होती. मात्र, गेल्या चार महिन्यात थकीत रकमेत प्रचंड वाढ झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील ६३ हजार ३२ घरगुती ग्राहकांकडे ७ कोटी २९ लाख ४६ हजार रूपये थकीत आहेत. वाणिज्यिक ९०४६ ग्राहकांकडे ३ कोटी ६१ लाख ४९, औद्योगिक १५५३ ग्राहकांकडे १ कोटी २७ लाख ८५ हजार, कृषीच्या ४ हजार ८४६ ग्राहकांकडे ३९ लाख ४२ हजार, १ हजार ८२ पथदिव्यांचे २ कोटी ७४ लाख ७३ हजार रूपये थकीत आहेत.
पाणी पुरवठा विभागाच्या १ हजार १३२ ग्राहकांकडे ९७ लाख २२ हजार, इतर सार्वजनिक सेवांसाठी १ हजार २६४ ग्राहकांकडे ३६ लाख ५८ हजार, अन्य २३४ ग्राहकांकडे ७ लाख २२ हजार मिळून एकूण ८२ हजार २०७ ग्राहकांकडे १६ कोटी ७३ लाख ९६ हजारांची थकबाकी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४६ हजार ३६१ घरगुती ग्राहकांकडे ५ कोटी ४५ लाख २८ हजार १०३ रूपये थकीत आहेत. वाणिज्यिक ५४६५ ग्राहकांकडे २ कोटी ६४ लाख ३८ हजार ७३४, औद्योगिक १२२७ ग्राहकांकडे १ कोटी १७ लाख ५ हजार ४७०, कृषीच्या ४ हजार ५६८ ग्राहकांकडे ४४ लाख ५४ हजार,२०५ रूपये थकीत आहेत. १ हजार ६८४ पथदिव्यांचे ५ कोटी २७ लाख ८८ हजार ५०४ रूपये थकीत आहेत. पाणी पुरवठा इतर सार्वजनिक सेवांसाठी मिळून १६ कोटी ७३ लाख ९६ हजारांची थकबाकी आहे.
मार्चमध्ये कोकण परिमंडलांतर्गत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याची थकबाकी ४ कोटी ७६ लाख २२ हजार होती. मात्र, गेल्या चार महिन्यांत ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत ३३ कोटी २२ लाख ८७ हजार रुपयांची थकबाकी असल्याने वसुलीचे मोठे आव्हान महावितरण पुढे आहे. पावसाळ्यामुळे महावितरणने ग्राहकांना वीजबिले भरण्याची संधी दिली होती. मात्र, ती न भरल्यामुळेच थकबाकीत वाढ झाली आहे. सध्या थकबाकी वसुली मोहीम तीव्र केली असून, थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांची वीज खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.- रंजना पगारे, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल